राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्यासमोरच भाजपा आमदाराचा धक्कादायक प्रकार घडला आहे. भाजपा आमदार सुनील कांबळे यांनी शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यास मारहाण केली. त्यानंतर पोलीस कर्मचाऱ्यास मारहण केल्याची घटना घडली. या कार्यक्रमास अजित पवार, हसन मुश्रीफ, सुनील तटकरे यांच्यासह काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकर उपस्थित होते.
पुणे येथील ससून रुग्णालयातील तृतीय पंथीय वार्डाचे उद्घाटन कार्यक्रमात हा प्रकार घडला. सदर राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. त्याचबरोबर आता विरोधकांनाही सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल केला आहे. शरद पवार गटाने देखील सदर घटनेवरुन निशाणा साधला आहे. ससून येथील कार्यक्रमात भाजपा आमदाराने एका पोलीस कर्मचाऱ्याच्या कानशीलात लगावल्याची घटना अत्यंत निंदनीय असल्याचं शरद पवार गटाने ट्विटद्वारे म्हटलं आहे.
महायुती सरकारचं चाललंय काय? अहिंसेच्या मार्गाने सुरु मराठा आरक्षण आंदोलनावर लाठीचार्ज काय होतो, वारकऱ्यांवर लाठीचार्ज होतो ते करण्याचे आदेश नेमके कोण देतं? एक मंत्री पोलिसांना जनतेला मारायला काय सांगतो, आमदार पोलिसांना मारतो काय, हे अतिशय गुंड प्रवृत्तीचे सरकार आहे, अशी टीका शरद पवार गटाने ट्विटद्वारे केली आहे.
पोलीस हे जवाबदार शासकीय कर्मचारी असून तुम्ही त्यांचे मालक नाहीत. पोलिसांवर अन्याय होत असताना राज्याचे गृहमंत्री गप्प का? आपल्या पक्षाच्या आमदारावर कारवाई करण्याच्या सूचना ते आपल्या विभागाला देतील का? या ट्रिपल इंजिन खोके सरकारकडून सामान्य जनतेसह पोलिसांवर होत असलेली दादागीरी अजिबात खपवून घेतली जाणार नाही. राज्यातील जनता हे उघड्या डोळ्याने पाहत आहे, ही सत्तेची मस्ती जास्त काळ टिकत नसते, असंही शरद पवार गटाने म्हटलं आहे.
या घटनेनंतर काय म्हणाले सुनील कांबळे?
भाजपाचे आमदार सुनील कांबळे यांनी मारहाण केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले, "मी ससूनमध्ये कोणत्याही पोलिसाला मारहाण केली नाही. तो माझ्या अंगावर पडल्यामुळे मी त्याला बाजूला सारून निघून गेलो." तसेच, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याला मी मारहाण केली नाही, त्याला सिव्हिल कपड्यांमध्ये असणाऱ्या पोलिसांनीच मारहाण केल्याचे सुनील कांबळे यांनी सांगितले.