सोलापूर - दोन वेळा पराभव झाला तरी मला आणि प्रणितीला भाजपानं पक्ष प्रवेशाची ऑफर दिली. परंतु आमच्या रक्तात काँग्रेस असल्याने ते शक्य नाही असा गौप्यस्फोट काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनी सोलापूरात केला आहे.
एका कार्यक्रमात सुशील कुमार शिंदे म्हणाले की,माझा दोनदा पराभव झाला तरीही मला आणि प्रणितीताईला भाजपा या अशी ऑफर आली आहे. ज्या आईच्या कुशीत आम्ही वाढलो. जिथं आमचं बालपण, तारुण्य गेले. आता ८३ वर्षाचा आहे. आता दुसऱ्याच्या घरात कसं जाणार? हे शक्य नाही. प्रणितीही अशा पक्षबदलाच्या भानगडीत कधी पडणार नाही. राजकारणात असं होत राहते. पराभवाबाबतीत एका पंडित नेहरू म्हणाले होते, लहान मुलाला सुरुवातीला आधार देऊन चालवावे लागते. त्यानंतर तो स्वत:चालतो. चालताना पडतो, पुन्हा उठतो आणि पुन्हा पडतो, उठतो मग चालायला लागतो आणि जेव्हा चालायला लागतो तेव्हा तो पुन्हा कधी पडत नाही. आपल्यालाही पुन्हा वैभवाचे दिवस येतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
तर काँग्रेसचे नेते भाजपाच्या संपर्कात आहेत की भाजपा काँग्रेस नेत्यांच्या संपर्कात आहे हे एकदा स्पष्ट करा. सुशीलकुमार शिंदे यांना दोनदा ऑफर दिली परंतु ते काँग्रेस सोडून कुठे जाणार नाहीत. प्रणितीही कुठे जाणार नाही याची मला खात्री आहे. पण भाजपाचा आत्मविश्वास ढळलेला आहे. प्रशासकीय कामावर भाजपाला विश्वास राहिलेला नाही. महाराष्ट्रातील नेत्यांवर विश्वास नसल्याने इतर पक्षातील नेत्यांना भाजपासोबत घेतेय. एकनाथ शिंदे, अजित पवारांना घेतले आणि काँग्रेस नेत्यांना घेण्याचा प्रयत्न आहे. परंतु आता भाजपाचा पराभव दिसत असताना कुणीही त्यांच्यासोबत जायला तयार नाही. काँग्रेसमध्ये नाराजी नाही. एखाद्याला पद मिळाले नाही तर नाराज होते. पक्षामुळे माणसं मोठी होतात, वैयक्तिक कुणी मोठे होत नाही असा टोला पृथ्वीराज चव्हाण यांनी भाजपाला लगावला.
दरम्यान, मोदींना आत्मविश्वास असता तर अर्धवट असतानाही मंदिरात रामाची प्रतिष्ठापना केली नसती. आता भाजपाकडे काही काम राहिले नाही. भाजपाचे महाराष्ट्रातील नेतृत्व अपयशी ठरल्याने ते इतर पक्षातील नेत्यांना गळ घालत आहेत असंही चव्हाण यांनी म्हटलं आहे.