मुंबई/शिरोली : राज्यात नवे सरकार स्थापन झाले असून, नव्या सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारात कोणाला मंत्रिपद मिळणार, याकडे सध्या सर्वांचे लक्ष लागले आहे. याचाच फायदा घेत, राष्ट्रीय पक्षातील आमदाराला कॅबिनेट मंत्रिपद मिळवून देण्याच्या नावाखाली चक्क १०० कोटी रुपयांची मागणी करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही ऑफर देणारा मुख्य सूत्रधार हा कोल्हापूरचा असून त्याचे नाव रियाज अल्लाबक्ष शेख असे आहे.याप्रकरणी गुन्हे शाखेने सापळा रचून चौकडीला बेड्या ठोकल्या आहेत. भाजपचे आमदार राहुल कुल यांनी यासंदर्भात मुंबई पोलिसांना माहिती दिल्यानंतर खंडणीविरोधी पथकाने ओबेरॉय हॉटेलमध्ये कुल आणि आमदार जयकुमार गोरे यांच्यासमोर ही कारवाई केली.आमदार राहुल कुल यांच्या स्वीय सचिवाला रियाझ शेख नावाने एकाने कॉल केला. आमदारसाहेबांशी बोलणे झाले असून, त्यांच्या खास कामासाठी दिल्लीहन मुंबईत आलो असल्याचे त्याने सांगितले. स्वीय सचिवांनी हा निरोप कुल यांना दिला. त्यावर चार दिवसांपूर्वी आपणासही या व्यक्तीचा फोन आला होता व मंत्रिपदासाठी तो १०० कोटी रुपये मागत होता, असे ते म्हणाले. कुल यांनी स्वीय सचिवाला व्यक्तीला या भेटण्यासाठी बोलाविण्यास सांगितले. त्यानुसार १७ जुलैला त्याला ओबेरॉय हॉटेलमध्ये बोलावण्यात आले.त्यानुसार रियाजशी चर्चा झाली. तडजोडीअंती ९० कोटींवर व्यवहार ठरला. त्यावर २० टक्के म्हणजे १८ कोटी रुपये काम होण्याआधी द्यावे. लागतील, अशी अट रियाझने ठेवली. कुल यांनी ती मान्य करून दुसऱ्या दिवशी पैसे घेण्यासाठी बोलावले. एका बाजूला पैसे देण्याची तयारी. दाखवत दुसऱ्या बाजूला त्यांनी याबाबतची माहिती मुंबई पोलिसांना दिली. त्यानुसार, खंडणीविरोधी पथकाने सापळा रचून रियाझसह योगेश कुलकर्णी (ठाणे), सागर संगवई (ठाणे) आणि जाफर उस्मानी (नागपाडा मुंबई) यांना बेड्या ठोकल्या आहेत.
रियाज मुळचा शिरोलीचा
- या प्रकरणातील मुख्य सूत्रधार कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोली (ता. हातकणंगले) येथील रियाज अल्लाबक्ष शेख (वय ४१, रा. शिरोली, जि. कोल्हापूर) आहे. रियाज हा शिरोली जिल्हा परिषद मराठी शाळा येथे पुणे-बंगळूर महामार्गालगतच पश्चिम बाजूला अलिशान बंगल्यात कुटुंबासह राहतो.
- दहावीपर्यंत शिकलेला रियाज १९९६ नंतर शिरोली येथील एका व्हिडिओ सेंटरमध्ये कामाला लागला, त्यानंतर गावातच केबल ऑपरेटिंगची कामे करू लागला. पण त्याला कमी वेळेत श्रीमंत व्हायचे होते. यातच तो कोल्हापुरातील एका मायनिंग उद्योजकाकडे कामाला लागला. काही दिवसांपूर्वी त्याने स्वतःची मायनिंग सुरू केली.
- शाहूवाडी व गोवा येथे मायनिंगमध्ये पैसे मिळवले. आलिशान गाड्या घेतल्या. जिल्ह्यातील काही राजकीय नेत्यांच्याबरोबरही संबंध वाढवले.
- याच रियाजने मुंबई, ठाणे येथील तीन सहकाऱ्यांना सोबत घेऊन नवीन मंत्रिमंडळात मंत्रिपद मिळवून देण्याच्या नावाखाली तीन आमदारांची फसवणूक करण्याचा प्रयत्न केला अन् पोलिसांच्या जाळ्यात अडकला.
आणखी काही आमदार होते रडारवरअटक करण्यात आलेल्या चौकडीने आणखी काही आमदारांची फसवणूक करण्याचा प्रयत्न केल्याचेही समजते. दिल्लीवरून आल्याचे सांगत त्यांची माहिती घेण्यास सांगितल्याचे नमूद केले. त्यानुसार, काही आमदारांशी फोनवरून चर्चादेखील केली आहे. यामध्ये कोणी पैसे दिले होते का, याबाबत गुन्हे शाखा तपास करीत आहे.