Shiv Sena Thackeray Group: छत्रपती संभाजीनगर येथे पहिली वज्रमूठ सभा झाल्यानंतर नागपुरात महाविकास आघाडीची वज्रमूठ सभा पार पडली. या सभेतील उद्धव ठाकरे यांनी शिंदे गट तसेच भाजपवर सडकून टीका केली. उद्धव ठाकरेंसह महाविकास आघाडीच्या नेत्यांनीही भाजप तसेच शिंदे गटावर जोरदार प्रहार केला. यातच आता उद्धव ठाकरेंनी आपला शब्द पाळला आणि १५ शिवसैनिकांचा लाखो रुपयांचा दंड भरल्याची माहिती देण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, काही वर्षांपूर्वी केलेल्या एका आंदोलनाप्रकरणी नांदेडच्या १९ आंदोलनकर्त्या शिवसैनिकांना गेल्या आठवड्यात न्यायालयाने पाच वर्षांची शिक्षा आणि प्रत्येकी १ लाख ६० हजार रुपयांचा दंड ठोठावला होता. पण एवढ्या मोठ्या दंडाची रक्कम कशी भरावी असा प्रश्न सर्वसामान्य शिवसैनिकांना पडला होता. यातील काही शिवसैनिकांची दंड भरण्याची आर्थिक ऐपत नव्हती. त्यामुळे या शिक्षाविरोधात अपिल करणेही अशक्य होते. अखेर मातोश्रीवर ही बातमी गेली. याबाबत माहिती मिळताच उद्धव ठाकरेंनी आदेश दिले आणि या शिवसैनिकांना ठोठवण्यात आलेल्या दंडाची रक्कम भरण्यात आली.
उद्धव ठाकरे यांनी दिलेला शब्द पाळला!
विशेष म्हणजे ज्या दिवशी शिक्षा सुनावण्यात आली त्याच दिवशी उद्धव ठाकरे यांनी या शिवसैनिकांच्या कुटुंबाच्या पाठिशी उभा राहणार असल्याचा शब्द दिला होता. त्यामुळे उद्धव ठाकरे यानी दिलेला शब्द पाळल्याचे आता बोलले जात आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचे सरकार असताना महागाईच्या विरोधात तत्कालीन आमदार अनुसया खेडकर यांच्या नेतृत्वाखाली हिंगोली गेट येथे आंदोलन करण्यात आले होते. महागाईविरोधातील या आंदोलनातही असंख्य शिवसैनिकांनी सहभाग नोंदवला. काही कारणांनी आंदोलनाला अचानक हिंसक वळण लागले. यात ८ बसची तोडफोड करण्यात आली. तर दोन पोलीस अधिकारी जखमी झाले होते. नांदेड पोलिसांनी या घटनेत १९ जणांवर गुन्हा नोंदवला होता.
मातोश्रीपर्यंत बातमी पोहोचली आणि सूत्र हलली
१५ वर्षानंतर हे प्रकरण अंतिम टप्प्यावर होते. ११ एप्रिल रोजी माजी आमदार अनुसया खेडकर, त्यांचे सुपुत्र महेश खेडकर यांच्यासह १९ जणांना न्यायालयाने ५ वर्षांची शिक्षा आणि प्रत्येकी १ लाख ६० हजार रुपये दंड ठोठावला. परंतु सर्वसामान्य कुटुंबातील अनेक शिवसैनिकांना हा दंड भरणे शक्य नव्हते. दरम्यान ही बाब मातोश्रीपर्यंत पोहचली आणि सूत्र हलली. तुरुंगात असलेल्या १९ जणांपैकी १५ जणांच्या दंडाची रक्कम पक्षाकडून न्यायालयात भरण्यात आली.
दरम्यान, कार्यकर्ता हा पक्षाचा कणा असतो. त्यामुळे हा कणा मजबूत असल्यास पक्षही मजबूत असतो. मात्र अनेकदा पक्षासाठी राबराब राबणाऱ्या कार्यकर्त्याला अडचणीत पक्षाकडून मदत मिळत नाही. परंतु, उद्धव ठाकरे यांनी कट्टर शिवसैनिकांच्या पाठीशी आपण खंबीरपणे उभे असल्याचा संदेश दिला, अशी चर्चा राजकीय वर्तुळात असल्याचे सांगितले जात आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"