Maharashtra Politics: आताच्या घडीला अनेकविध मुद्द्यांवरून राजकीय वातावरण तापल्याचे पाहायला मिळत आहे. महाविकास आघाडी आणि सत्ताधारी शिंदे-भाजप सरकार यांच्यातील आरोप-प्रत्यारोप तीव्र होताना दिसत आहेत. यातच ‘हर हर महादेव’ आणि ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ या चित्रपटांना विरोध वाढताना दिसत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस याबाबत आक्रमक झाली असून, राज्यातील काही ठिकाणी ‘हर हर महादेव’ चित्रपटाचे शो बंद पाडण्यात आले. यावरून आता राष्ट्रवादीवर टीका करण्यात येत आहे. ‘हर हर महादेव’ चित्रपटाच्या वादात बाबासाहेब पुरंदरे यांना का ओढता आहात? बाबासाहेब पुरंदरे यांनी या सिनेमाची कथा लिहिली आहे का? अशी विचारणा करण्यात आली आहे.
‘हर हर महादेव’ चित्रपटाविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आमदार जितेंद्र आव्हाड चांगलेच आक्रमक झाले आहेत. या चित्रपटाचा ठाण्यातील शो बंद पाडण्यात आला होता. यातच आता ब्राह्मण महासंघाचे नेते आनंद दवे यांनी आक्रमक भूमिका घेतलेली असून, राष्ट्रवादी काँग्रेसवर पलटवार केला आहे. या सिनेमाला सर्वात प्रथम विरोध आम्ही केला, असा दावाही आनंद दवे यांनी केला.
फक्त पुरंदरेच दिसतात का तुम्हाला?
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी जाहीरपणे बाबासाहेबांचे कौतुक केले होते, त्याबाबत काय बोलणार आहात? राजांना सेक्युलर ठरवण्याचे पाप तुम्ही आणि तुमचे सहकारी वारंवार करत आहात? द्याल का पुरावे? स्वराज्याच्या दुसऱ्या छत्रपतींना हाल हाल करून मारणाऱ्या औरंगजेबाच्या जातीवर कधी बोलणार आहात? का फक्त पुरंदरेच दिसतात तुम्हाला? द्या याची उत्तरे. आम्ही तयार आहोत तुमच्या बरोबर जाहीर चर्चा करायला. तुम्ही तयार आहात का चर्चेला? असे खुले आव्हान आनंद दवे यांनी दिले आहे.
चित्रपटाच्या आडून जातीय राजकारण का करता आहात?
‘हर हर महादेव’ चित्रपटाच्या वादात बाबासाहेब पुरंदरे यांना का ओढता आहात? बाबासाहेब पुरंदरे यांनी या चित्रपटाची कथा लिहिली आहे का? बाबासाहेबांच्या कोणत्या लेखात असा उल्लेख आहे? चित्रपटाच्या आडून जातीय राजकारण का करता आहात? तुम्हाला जागे व्हायला संभाजी राजे यांचे वक्तव्य यावे लागले? चित्रपट चुकला आहे हे निश्चितच. पण त्या आडून घाणेरडे जातीय राजकारण करू नका. इतकी वर्ष सत्तेत आहात. का नाही एक समिती स्थापन केली खरा इतिहास शोधायला? असा थेट सवाल आनंद दवे यांनी केला आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"