मुंबई – आनंद दिघेंच्या अंत्यदर्शनाला कोण कोण उपस्थित होते, ठाकरे परिवारातील हे व्हिडिओ असतील तर पाहा. आनंद दिघेंचे नाव गद्दारांशी जोडू नका. दिघे हे निष्ठावंत शिवसैनिक होते. बाळासाहेबांवर श्रद्धा असलेले शिवसैनिक होते. गद्दारांच्या तोंडी दिघेंचे नाव येणे म्हणजे त्यांच्या निष्ठेचे अपमान आहे. त्यामुळे गद्दार काय बोलतात याकडे लक्ष देण्याची गरज नाही अशा शब्दात ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शिंदेंसह समर्थक आमदारांना टोला लगावला आहे.
संजय राऊत म्हणाले की, काल उद्धव ठाकरेंच्या भाषणावेळी गडकरी रंगायतनमधील हॉल, गॅलरी, लॉबी, बाहेरचे रस्ते हे सर्व भरगच्च भरले होते. ही गर्दी पाहून अनेकांच्या डोळ्यात खुपले असेल त्यातून अशाप्रकारे टीका करण्यात येत आहे असंही राऊत म्हणाले.
मणिपूरवरून राऊतांचा भाजपावर निशाणा
ज्या मणिपूरमध्ये मंत्र्यांची घर जाळली जातात, महिलांचे लग्न परेड काढले जातात, आतापर्यंत त्या ठिकाणी ना प्रधानमंत्री गेले आहेत, ना त्यावर कोणी बोललं आहे. आम्ही वेळोवेळी बोललो आहोत की, मणिपूर हा देशाचा भाग आहे. त्यांचा आक्रोश आहे का? जर ते जात नसतील तर आमचं कर्तव्य आहे की, आमचं शिष्टमंडळ तिथे गेलं तर त्यात आमचा शो ऑफ नाही. ते भारताचे नागरिक आहेत. त्यांचा आक्रोश ऐकावा लागेल. आमच्या सर्व विरोधी पक्षाचे शिष्टमंडळ तेथे गेलं. याला शो ऑफ कसं म्हणू शकतात अशा शब्दात भाजपाच्या टीकेला राऊतांनी प्रत्युत्तर दिले आहे.
त्याचसोबत आम्ही तेथे जाऊन लोकांची समस्या ऐकली, त्यांच्याशी बातचीत केली, जर याला तुम्ही शो ऑफ म्हणत असाल तर इतकी क्रूर सरकार आम्ही आतापर्यंत पाहिली नाही. पूर्ण आदिवासी समाज सर्व देशांमध्ये सरकार विरोधात घेराबंदी केल्याशिवाय राहणार नाही. ज्या पद्धतीने मणिपूरबद्दल भाजपचे लोक ज्या पद्धतीने अभद्र भाषेचा वापर करत आहेत, पूर्ण आदिवासी समाज आणि देशाचा हा अपमान आहे असंही संजय राऊत म्हणाले.