मुंबई – शहरातील बसस्टॉपचा कायापालट केल्याबदल्ल महिंद्रा ग्रुपचे चेअरमन आनंद महिंद्रा(Anand Mahindra) यांनी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे(Aaditya Thackeray) यांचे कौतुक केले आहे. तर आदित्य ठाकरे यांनीही महिंद्रा यांच्या ट्विटला प्रतिक्रिया देत धन्यवाद म्हटलं आहे. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईतील बसस्टॉपचं चित्र पूर्णपणे बदलण्यासाठी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंसह मुंबई महापालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांचेही आनंद महिंद्रा यांनी कौतुक केले आहे.
आनंद महिंद्रा यांनी ट्विटमध्ये लिहिलंय की, अखेर मुंबईत वर्ल्डक्लास बस स्टॉप पाहायला मिळतील. एक्सरसाइज बार आणि कूल ग्रीन छतासारखे अनोखे फिचर्स शानदार आहेत. वाह आदित्य ठाकरे, इकबाल सिंह चहल, महिंद्रा यांच्या या ट्विटवर आदित्य ठाकरे यांनीही रिट्विट करत म्हटलंय की, धन्यवाद आनंद महिंद्राजी, याचा हेतू आपल्या शहरातील आरामदायी सार्वजनिक वाहतूक आणि डिझाइन एस्थेटिक्सला आणखी दर्जेदार करणे. त्यासाठी आम्ही बसेसच्या संख्येत मोठ्या प्रमाणात इलेक्ट्रिक बसेसची संख्या वाढवली. त्यामुळे बसस्टॉप सर्व प्रवाशांसाठी उपयुक्त असावेत ही योजना आम्ही आखली असं आदित्य ठाकरे म्हणाले.
महिंद्रा यांच्या ट्विटरवर युजर्स त्यांच्या रिएक्शन देत आहेत. एका युजर्सने म्हटलंय की, एक्सरसाइज बार कूल आहे परंतु ग्रीन छताबाबत सहमत नाही. त्यात पाणी टाकण्याचं आणि मेन्टेन करण्याचं काम कोण करणार? जर तुम्ही छतावर सोलर पॅनल लावलं असतं तर त्यातून वीज निर्माण झाली असती. त्यामुळे अतिरिक्त इन्कमही महापालिकेला मिळालं असतं. त्यावर आनंद महिंद्रा यांनीही चांगला प्रश्न आहे. मीदेखील हा प्रश्न केला होता. जिथे शक्य असेल तिथे रुफ टॉपऐवजी सोलर पॅनेल लावायला हवं. आपले बसस्टॉप स्वच्छ आणि सुंदर असावेत हा मुख्य उद्देश आहे असं त्यांनी सांगितले.