मुंबई - दिघे साहेबांना पडद्यावर पाहून मला आजच गुरुपौर्णिमा झाल्यासारखी वाटल्याची भावना व्यक्त करत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, आनंद दिघे साहेबांचे कार्य लोकांसमोर आणण्यासाठी 'धर्मवीर' बनला. त्यातून दिघे साहेबांचे कार्य जगासमोर आले, पण त्यांचे कार्य खूप मोठे आहे. त्यासाठी 'धर्मवीर २' बनवण्यात आला आहे. त्यांचे कार्य एका सिनेमात मावणारे नाही. 'आनंद मरा नहीं करते...' हा आनंद सिनेमातील डायलॉग म्हणत शिंदे यांनी आनंद दिघे यांच्या विचारांचे वर्णन केले. 'धर्मवीर २'च्या ट्रेलर लाँच सोहळ्यात शिंदे बोलत होते.
वरळी येथील एनएससीआय डोममध्ये आयोजित भव्य सोहळ्यात 'धर्मवीर २' चित्रपटाचा ट्रेलर प्रकाशित करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सलमान खान, मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार, गोविंदा, महाराष्ट्र भूषण अशोक सराफ, बमन इराणी, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, लेखक-दिग्दर्शक प्रवीण तरडे, दिग्दर्शक महेश कोठारे, जितेंद्र, मंगेश देसाई, प्रसाद ओक, झी समूहाचे एमडी आणि सीईओ पुनीत गोएंका, मंत्री मंगलप्रभात लोढा आदी मंडळी उपस्थित होती. धर्मवीर २ हिंदीचा ट्रेलर प्रकाशित झाल्यानंतर सलमान म्हणाला की, 'धर्मवीर'च्या स्क्रिनिंगसाठी आलो होतो. तो सिनेमा सुपरहिट झाला होता आणि दुसरा भागही सुपरहिट होईल अशी भावना व्यक्त करत सलमानने 'धर्मवीर २'ला शुभेच्छा दिल्या.
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, हिंदुत्वाशी गद्दारी करणाऱ्यांना क्षमा नाही, हीच आमच्या सरकारचीही टॅगलाईन आहे. 'धर्मवीर' सिनेमाने तो काळ जिवंत केला. या सिनेमाने अनेकांना प्रेरणा दिली. हा सिनेमा आला तेव्हा याचा दुसरा भाग येईल असे कोणाला वाटले नव्हते. या सिनेमा प्रमाणेच शिंदे यांचाही दुसरा भाग सुरू आहे. दिघेसाहेबां प्रमाणेच शिंदे यांनाही विचारांशी गद्दारी मान्य नव्हती. म्हणून ते बाहेर पडले. महाराष्ट्राच्या जनतेने अस्सल सोने ओळखून त्यांच्या हाती सत्ता दिली असल्याचेही फडणवीस म्हणाले.
मुखवटे गळून पडतील...मलाही सिनेमा काढायचा आहे. मी जेंव्हा सिनेमा काढेन तेंव्हा अनेकांचे मुखवटे गळून पडतील, फडणवीस म्हणाले.
तयारी सुरू करा...धर्मवीर ३ आणि ४ ची तयारीही सुरू करा प्रवीण तरडे यांना फडणवीस यांनी सांगितले.
राहुल नार्वेकर म्हणाले की, 'धर्मवीर' हा सिनेमा इतिहास घडवण्यासाठी आहे. राजकारण आणि समाजकारणातील उत्तम धडे तरुण पिढीला मिळतील असेही ते म्हणाले.
आशिष शेलार म्हणाले की, स्वतःपेक्षा समाज, धर्म, देशाला प्राधान्य देणाऱ्या विचारांसाठी जगणाऱ्या आणि कार्यकर्त्याला मुख्यमंत्री बनण्याची शक्ती देणाऱ्या आनंद दिघे यांची कथा यात आहे. भावी काळात शिंदेशाही पार्ट टू असलेले सरकार येईल अशी आशाही त्यांनी व्यक्त केली.
ट्रेलर पाहून सिनेमा सुपरहिट होईल याची खात्री पटली असून, चित्रपटाप्रमाणेच एकनाथ शिंदे महाराष्ट्रालाही सुपरहिट बनवतील अशी आशा महेश कोठारे यांनी व्यक्त केली.
अशोक सराफ म्हणाले की, राजकीय व्यक्तिमत्वावर इतका सुंदर सिनेमा बनू शकतो हे 'धर्मवीर'ने दाखवून दिले आहे. दुसरा भाग त्यांच्या जीवनातील आणखी तत्वे समाजासमोर आणेल असेही अशोक सराफ म्हणाले.
'जिथे धर्म तिथे जय', असे अत्यंत कमी शब्दांत गोविंदाने 'धर्मवीर'चे समर्पक वर्णन केले.
प्रवीण तरडे म्हणाले की, दिघे साहेबांवर सिनेमा बनवणे सोपे नव्हते. त्यांच्या आजूबाजूला असलेले लोक सोबत असताना मोठं दडपण होते. दुसरा भाग करताना खूप मोठी जबाबदारी होती. हा चित्रपट वेगळ्या पद्धतीने उलगडत जाणार आहे. तीन तासात मावेल इतकं छोटं आयुष्य दिघे साहेबांचे नव्हते. हिंदुत्ववाची गोष्ट दुसऱ्या भागात पाहायला मिळेल.दुसऱ्या भागानंतरही त्यांची कथा संपणारी नसल्याचे सांगत प्रवीणने 'धर्मवीर ३'चेही संकेत दिले.
प्रसाद ओक म्हणाला की, बायोपीकमधील व्यक्तिरेखा पुन्हा साकारण्याचा बहुमान मला मिळाला आहे. असे पहिल्यांदाच घडत असल्याने मी स्वतःला भाग्यवान मानतो.