मुंबई - गेल्या २ वर्षापासून देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्र्यांनी आम्हाला राज्यपालपदाचा शब्द दिला होता. शिवसेनेसाठी १ राज्यपालपद मिळणार होतं, ते अडसूळांना देऊ असं सांगितले होते. तशी चर्चाही अमित शाहांसोबत झाली होती. अमरावतीची जागा सोडण्यासाठी आम्हाला शब्द दिला होता मात्र तो पूर्ण झाला नाही त्यामुळे अडसूळ कुटुंबीय नाराज असल्याचं पुढे आले आहे. अभिजीत अडसूळ यांनी याबाबत भाजपाकडून आमच्यावर अन्याय होतोय अशी खंतही व्यक्त केली.
अभिजीत अडसूळ म्हणाले की, २७ मार्चला अमित शाहांसोबत झालेल्या बैठकीत आनंदराव अडसूळांना राज्यपाल बनवणार आहोत त्याबाबत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना त्याच दिवशी शिफारस पत्र पाठवा अशी सूचना केली. दोघांनी सह्या करून ते पत्र अमित शाहांना पाठवले. त्यानंतर नीती आयोगाच्या बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीत गेले होते. तेव्हाही आणखी एक पत्र शाहांना पाठवले. मात्र दुसऱ्या दिवशी जी यादी आली त्यात नाव नव्हतं असा आरोप त्यांनी केला.
तसेच राज्यपालपद न मिळाल्याने वडिलांनी खंत व्यक्त केली. प्रविण दरेकर हे मुंबई बँकेवर संचालक आहेत ते संचालकही होऊ शकले नसते. तुझ्यावरती अन्याय झाला परंतु मला त्या निवडणुकीत माघार घ्यायला लावली. अभिजीतला माघार घ्यायला लावत असाल तर त्याला कॉप करून घ्या असं फडणवीसांना सांगितले होते. गेली अडीच वर्ष शब्द दिला तरी तो पाळला नाही. मुख्यमंत्र्यांनी तिनदा सांगितले तरी ते अजून झाले नाही. मी कुणाकडे भीक मागितली नाही. लोकसभेत माघार घेतली, मुंबई बँक निवडणुकीत माघार घेतली अशी आठवणही अभिजीत अडसूळांनी सांगितली. माध्यमांशी बोलताना अभिजीत अडसूळांनी हा प्रकार सांगितला.
दरम्यान, प्रत्येकवेळी केराची टोपली दाखवली. २ वर्ष आम्ही थांबलो, प्रविण दरेकरसारखे पदाधिकारी ऐकत नसतील तर अमित शाह ऐकतील का असं वडील म्हणाले, जी परिस्थिती आहे ती आम्ही समोर मांडली. महायुतीत हे चुकीचे होतंय, अन्याय झाल्याची भावना आमच्या कार्यकर्त्यांच्या मनात आहे. प्रत्येकवेळी बलिदान द्यायचं आणि शांत राहायचं असं नाही. एकनाथ शिंदे यांनी आमच्यावर विश्वास ठेवला, आम्ही त्यांच्या प्रेमापोटी टिकून आहोत. शिवसेना-भाजपा युती म्हणून आम्ही एकत्रित आहोत. आमच्यावर देवेंद्र फडणवीस प्रेम करतात मग आम्हाला मागे का ठेवले जाते असा प्रश्न पडतो असंही अभिजीत अडसूळ यांनी म्हटलं.