मुंबई : नोटाबंदीमुळे शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळावी आणि स्वामीनाथन आयोग तत्काळ लागू करण्यात यावा; या मागण्यांसाठी ५ जानेवारीला अमरावती आयुक्त कार्यालयावर नांगर आंदोलन छेडण्यात येणार आहे. प्रहार संघटनेचे संस्थापक आणि आमदार बच्चू कडू यांनी बुधवारी या आंदोलनाची घोषणा केली. सत्ताधारी शिवसेनेलाही आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन केल्याचे त्यांनी सांगितले.शेतकऱ्यांच्या स्वप्नांवर सरकार नांगर फिरवत असल्याने सरकारला धडा शिकविण्यासाठी नांगर आंदोलन छेडण्यात येणार आहे. विदर्भातील सोयाबीन, कापूस आणि संत्रा शेतकरी नोटाबंदीमुळे हवालदिल झाले आहेत. संत्रा, कापूस, सोयाबीन तूर व धान्य उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपयांची मदत, पीक कर्जाच्या रकमेत वाढ, २०१४-१५ आणि २०१५-१६पासूनचे ठिबक सिंचनाचे प्रलंबित अनुदान शेतकऱ्यांना तातडीने जाहीर करा, आदी मागण्यांसाठी रस्त्यावर उतरणार असल्याचे कडू यांनी स्पष्ट केले. स्वामीनाथन आयोग त्वरित लागू करावा, शेतमजुरांना अपघात व आरोग्य विमा द्यावा, पेरणी ते कापणीची सर्व कामे एमआरईजीएसअंतर्गत करावे, अशी मागणीही कडू यांनी केली. ‘मातोश्री’वर झालेल्या बैठकीनुसार आंदोलनात सत्ताधारी शिवसेनाही सहभाग घेणार होती. शिवसेना शेतकऱ्यांच्या आंदोलनात सामील झाल्यास त्यांना लवकर न्याय मिळेल. यासाठी सेनेने आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहनही बच्चू कडू यांनी केले. (प्रतिनिधी)
नोटाबंदीच्या निषेधार्थ नांगर आंदोलन
By admin | Published: December 29, 2016 2:02 AM