मुंबई: माजी केंद्रीय मंत्री आणि शिवसेना नेते अनंत गीते यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर शेलक्या शब्दात टीका केली. त्यांच्या टीकेला राष्ट्रवादीकडून प्रत्युत्तर देण्यात आलं. यातच आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही गीतेंच्या विधानावर प्रतिक्रिया दिली आहे.
मीडियाशी संवाद साधताना नाना पटोले म्हणाले, 'शिवसेनेचे माजी खासदार अनंत गीते यांचं महाविकास आघाडी सरकारबाबतचं विधान अगदी योग्च आहे. महाविकास आघाडी ही तत्कालीन राजकीय परिस्थिती पाहून तयार झालेली आहे. त्यामुळे अनंत गीतेंच्या या वक्तव्याचं आम्ही समर्थन करतो', असं पटोले म्हणाले.
याशिवाय, 'अनंत गीतेंनी राष्ट्रवादीवर खंजीर खुपसल्याची टीका केली. शरद पवारांवरही वक्तव्यं केलं, पण आम्ही त्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देणार नाहीत. फक्त गीतेंच्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र होतो या वाक्याशी सहमत आहोत. अनंत गीते काहीच चुकीचं बोलले नाहीत,' असंही पटोले म्हणाले. तसेच,
काय म्हणाले होते अनंत गीते?श्रीवर्धन तालुक्यातील एका कार्यक्रमात बोलताना अनंत गीतेंनी काँग्रेस-राष्ट्रवादीबाबत भाष्य केलं होतं. 'मी शिवसेनेचा नेता म्हणून बोलतोय. शिवसेना काय आहे हेच फक्त सांगणार आहे. राज्यात आपलं सरकार आहे, आपलं कशासाठी म्हणायचं तर मुख्यमंत्री आपले आहेत. पण बाकी काँग्रेस-राष्ट्रवादी आपले नाहीत. दोन्ही काँग्रेस हे कधी एकमेकांचे तोंड बघत नव्हते. यांची विचारांची सांगड बसत नव्हती, एक मतं नव्हती. दोन काँग्रेस एका विचाराची होऊ शकत नाही, तर शिवसेना काँग्रेस एकविचाराची कदापी होऊ शकणार नाही. मुळात राष्ट्रवादीचा जन्मच काँग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसून झालेला आहे', असं अनंत गीते म्हणाले होते.