मुंबई : शिवसेनेच्या शनिवारी झालेल्या बैठकीत खासदार अनंत गिते यांची पक्षाचे लोकसभेतील गट नेता म्हणून फेरनिवड करण्यात आली.
नवनिर्वाचित 18 खासदारांनी शनिवारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. उद्धव यांचे निकटवर्तीय समजले जाणारे अनंत गिते रायगड मतदारसंघातून सलग सहा वेळा निवडून आले आहेत. यंदा झालेल्या अटीतटीच्या लढतीत गितेंनी जलसंपदा मंत्री सुनील तटकरे यांचा अवघ्या 2 हजार 21क् मतांनी पराभव केला.
उद्धव यांच्या भेटीनंतर काही ज्येष्ठ खासदारांनी नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळात स्थान मिळण्याची इच्छा व्यक्त केली. खा. अनंत गिते, आनंदराव अडसूळ आणि भावना गवळी यांनी ज्येष्ठत्वाच्या निकषावर आपली मंत्रिमंडळात वर्णी लागावी, अशी इच्छा बोलून दाखविली़ सलग सहा वेळा खासदार म्हणून निवडून आलो. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आपल्याकडे नक्की मंत्रीपद सोपवतील, असा विश्वास गिते यांनी व्यक्त केला. तर अडसूळ यांनी अर्थ आणि रेल्वेचा अभ्यास असल्याचे सांगत ही खाती सांभाळण्याची इच्छा व्यक्त केली. (प्रतिनिधी)