Anant Ambani Radhika Merchant Wedding :अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट आज (12 जुलै 2024) विवाहबंधनात अडकणार आहेत. महाराष्ट्राची राजधानी मुंबईत हा शाही सोहळा होत आहे. या लग्नाला देश-विदेशातील मान्यवर पाहुणे मुंबईत जमू लागले आहेत. विशेष म्हणजे, या लग्नासाठी देशभरातील अनेक बडे नेते उपस्थित राहणार आहेत. यात इंडिया आघाडीतील नेत्यांचाही समावेश आहे. या लग्नाच्या बहाण्याने सर्व विरोधी पक्ष पुन्हा एकदा मुंबईत एकवटत आहेत.
ममता-लालू-अखिलेश मुंबईत दाखलपश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी गुरुवारीच (11 जुलै 2024) मुंबईत दाखल झाल्या आहेत. मुंबईत येण्यापूर्वी तयांनी सांगितले होते की, त्या शरद पवार, उद्धव ठाकरे आणि अखिलेश यादव यांची भेट घेणार आहेत. मात्र, त्यांनी राहुल गांधी यांचे नाव घेणे टाळले. मिळालेल्या माहितीनुसार, अनंत-राधिकाच्या लग्नाला गांधी परिवारातील कोणीही उपस्थित राहणार नाही. दरम्यान, समाजवादी पक्षाचे प्रमुख आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव आणि राष्ट्रीय जनता दल (आरजेडी) प्रमुख लालू यादव हेदेखील अनंत अंबानींच्या लग्नाला उपस्थित राहण्यासाठी कुटुंबासह मुंबईत पोहोचले आहेत.
इंडिया आघाडीची बैठक होणार ?येत्या काही महिन्यात महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका होणार आहेत. सध्या महाराष्ट्रात अबू आझमी यांच्यासह सपाचे दोन आमदार आहेत. लोकसभा निवडणुकीनंतर आता महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीकडे इंडिया आघाडीचे लक्ष लागले आहे. अंबानी कुटुंबाच्या सोहळ्यामुळे सर्व विरोधी नेते मुंबईत दाखल झाले आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, त्यांच्यात आगामी विधानसभा निवडणुकीबाबत शरद पवारांच्या निवासस्थानी बैठक होऊ शकते.
देश-विदेशातील दिग्गज मुंबईत दाखलमुकेश अंबानी यांच्या मुलाच्या लग्नात सहभागी होण्यासाठी राजकारण, क्रीडा, उद्योग, बॉलिवूड, हॉलीवूड, क्रीडा आणि इतर अनेक क्षेत्रातील दिग्गज मुंबईत पोहोचले आहेत. यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, जगदीप धनखर, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन, काँग्रेस नेते दिग्विजय सिंह, सचिन पायलट, सलमान खुर्शीद यांच्यासह अनेक नेते लग्नाला उपस्थित राहणार आहेत.