प्रादेशिक मनोरुग्णालय : अॅम्ब्युलन्समध्ये रुग्णांना कोंबून प्रवास नागपूर : गुराढोरासारखे कोंबले जावे तसे अॅम्ब्युलन्समध्ये मनोरुग्णांना कोंबून उपचारासाठी ने-आण केली जात आहे. केवळ प्रशासकीय दिरंगाईचा हा फटका मागील अनेक वर्षांपासून रुग्णांना बसत आहे. वेड्यांकडे काय लक्ष द्यायचे, अशा भावनेतूनच आरोग्य खाते काम करीत असल्याचे हे चित्र आहे. सरकारी अनास्थेमुळे नागपूरच्या प्रादेशिक मनोरुग्णालयाची अवस्था बिकट झाली आहे. दररोजच्या ताणतणावांमुळे मनोरुग्णांची संख्या वाढत असताना, आजही जुन्याच पद्धतीचे उपचार व औषधांचा वापर सुरू आहे. तुरु ंगातल्या कैद्यांपेक्षाही इथल्या रुग्णांची अवस्था दयनीय आहे. लालफितीची मनमानी, अपुरा निधी, आवश्यक औषधांचा तुटवडा, डॉक्टरांची कमतरता, पर्यायी उपचारांची वानवा अशा त्रुटींमुळे इथल्या कारभाराचा बोजवारा उडाला आहे. सध्या मनोरुग्णालयात ५८० स्त्री व पुरुष रुग्ण उपचार घेत आहेत. परिस्थितीमुळे त्यांचा स्वत:शी मानसिक संघर्ष सुरू आहे. या संघर्षात मनोविकार तज्ज्ञांसोबत आवश्यक सोयीसुविधांची साथ मोलाची आहे. मात्र, तोकड्या सोयींमुळे रुग्णांवर याचा परिणाम होत आहे. मनोरुग्णालयात फिजिशियन डॉक्टर असतानाही रोज पाच-सहा रुग्ण मेडिकलमध्ये उपचारासाठी पाठविले जातात. रुग्णालयाकडे एकच अॅम्ब्युलन्स आहे. यात जास्तीतजास्त सहा जण बसू शकतील, अशी सोय आहे. परंतु चार-पाच रुग्णांसोबत तेवढेच अटेंडंटस् आणि एक स्टाफ नर्स असे मिळून १० ते ११ जण बसतात. यातच अटेंडंटस् स्वत: सीटवर बसून रुग्णांना खाली बसवितात. रुग्णांना अक्षरश: कोंबून हा प्रवास होतो. विशेष म्हणजे, मागील अनेक वर्षांपासून हा जीवघेणा प्रवास सुरू आहे. यासंदर्भात दोन वर्षांपूर्वी मोठ्या अॅम्ब्युलन्सचा प्रस्ताव आरोग्य विभागाला पाठविण्यात आला. परंतु अद्यापही याला मंजुरी मिळू न शकल्याने याचा फटका रुग्णांना बसत आहे. (प्रतिनिधी)
अनास्थेचा ‘मेंटल ब्लॉक’
By admin | Published: January 06, 2015 1:08 AM