मुंबई : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर हायवेपासून ५०० मीटर अंतरावरील मद्यविक्री करणाऱ्या हॉटेल, रेस्टॉरंट आणि बारवर बंदी आली आहे. या निर्णयामुळे महाराष्ट्रासह पश्चिम भारतातील सुमारे १० लाख रोजगारांवर गदा येण्याची भीती हॉटेल मालकांच्या हॉटेल अॅण्ड रेस्टॉरंट असोसिएशन आॅफ वेस्टर्न इंडियाने व्यक्त केली आहे.सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन सुरू झाल्यानंतर पश्चिम भारतातील सुमारे ३५ हजार रेस्टॉरन्ट आणि बार बंद होतील. त्यामुळे सुमारे १० लाख रोजगार हिरावले जातील. अशा परिस्थितीत हॉटेल चालवणे अशक्य आहे. मुळात हा व्यवसाय सुरू करताना नियमांसह धंद्यातील मर्यादा आणि संधीसह त्यातून मिळणाऱ्या उत्पन्नाचा विचार केला जातो. गुंतवणुकीच्या मानाने या व्यवसायात नगण्य फायदा मिळतो. त्यातही सर्वाधिक मागणी असलेल्या मद्यावरच बंदी घातल्यास संपूर्ण व्यवसायच उद्ध्वस्त होण्याची भीती निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत जेमतेम तग धरून असलेली बहुतेक रेस्टॉरंट या नव्या नियमामुळे बंद होण्याची भीती संघटनेचे अध्यक्ष दिलीप दातवानी यांनी व्यक्त केली आहे.राज्यातील १३ हजार ६५५ मद्यविक्री करणाऱ्या बार आणि दुकानांमधील मुंबईतील २९० आणि मुंबई महानगर प्रदेशातील २ हजार बार व दुकाने या निर्णयामुळे बंद होणार असल्याचा दावा संघटनेचे माजी अध्यक्ष कमलेश बारोट यांनी केला आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील ९ हजार ९२५ रेस्टॉरंट आणि बार यांचा व्यवसाय धोक्यात आला असून त्यामुळे राज्याला मोठे नुकसान सहन करावे लागणार आहे. सद्य:स्थितीत देशातील खाद्य पुरवठा व्यवसायातून ४०८ हजार कोटींचा गल्ला जमत असला, तरी या निर्णयामुळे सुमारे २०० कोटींचा फटका या क्षेत्राला बसेल. या बंदीचा फटका हॉटेल उद्योगाशी निगडित पर्यटन, खाद्य आणि उत्पादन शुल्क विभागाला सहन करावा लागणार आहे. एकंदरीतच पर्यटन क्षेत्रातील ३ कोटी ७४ लाख रोजगारांपैकी सुमारे १० लाख रोजगार कमी होण्याची भीती बारोट यांनी व्यक्त केली आहे. (प्रतिनिधी)>समस्येच्या मुळाशी जाण्याची गरज!अधिकृतरीत्या परवानाधारक बार आणि रेस्टॉरंट मालक या आदेशाचे पालन करत धंदे बंद किंवा स्थलांतरित करतील. मात्र विनापरवाना मद्यविक्री यापुढेही सर्रासपणे सुरूच राहणार आहे. महत्त्वाची बाब म्हणजे मद्य सेवन करणारे अशा जागांचा शोध आपसूकच घेतील. त्यामुळे संपूर्ण जगाला भेडसावणाऱ्या ड्रंक अॅण्ड ड्राइव्ह समस्येविरोधात मुळाशी जाऊन कठोर पावले उचलण्याची गरज आहे. याउलट परवानाधारक हॉटेल्सवर बंदी घातल्याने हा प्रश्न सुटणार नाही, अशी प्रतिक्रिया संघटनेचे माजी अध्यक्ष भारत मलकानी यांनी व्यक्त केली.
दारूमुक्त महामार्गामुळे १० लाख रोजगारांवर टाच
By admin | Published: April 03, 2017 5:47 AM