- विवेक चांदूरकर, वाशिम
वऱ्हाडातील अकोला, वााशिम आणि बुलडाणा जिल्ह्यातील मंदिरे आणि प्राचीन वास्तूंमध्ये आपल्या संस्कृतीचे दर्शन घडविणारी विविध शिल्पे कोरण्यात आली आहेत. प्राचीन शिल्पकलेचा हा उत्कृष्ट नमुना असून, त्यांचे जतन होणेगरजेचे आहे; मात्र देखभालीअभावी काही वास्तू नामशेष झाल्या असून, काही नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत.प्राचीन मंदिरे तसेच ऐतिहासिक वास्तूंवर त्या-त्या काळातील संस्कृतीचे दर्शन घडविणारी विविध शिल्पे कोरण्यात आली आहेत. आधुनिक युगात हा इतिहास मागे पडला असून, मौल्यवान वास्तू व शिल्पे आता नामशेष होत आहेत. अकोल्याहून ३५ किलोमीटर अंतरावर असलेल्या लासूर येथील आनंदेश्वर मंदिरावर अनेक शिल्पे आहेत. लोणार सरोवर परिसरात असलेल्या विविध मंदिरांच्या खांबांवर समुद्रमंथन, आई-वडिलांना कावडमध्ये घेऊन जाणारा श्रावण बाळ यांसह विविध शिल्पे कोरली आहेत. देखभालीचा अभाव आणि ऊन, पावसामुळे या शिल्पांची दिवसेंदिवस झीज होत आहे. पुरातत्त्व खात्याने या शिल्पांचे संवर्धन करण्याची गरज आहे.अनेक अप्रतिम आणि उत्कृष्ट शिल्पे काळ्या पाषाणात कोरण्यात आली आहेत. अशी निर्मिती आता होणे नाही. त्यांचे जतन करणे ही सर्वांचीच जबाबदारी आहे. विदेशात छोट्या-छोट्या गावांमधील मूर्ती व शिल्पांचे संवर्धन करण्यात आले आहे. त्याप्रमाणेच भारतातही व्हायला हवे. - प्रा.डॉ. सचितानंद बिचेवार, इतिहास विभाग, पी.डी. जैन महाविद्यालय, अनसिंग, वाशिम