ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 8 - एकीकडे सत्तेत राहूनही शिवसेना सातत्याने देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारच्याविरोधात भूमिका घेत आहे. प्रसंगी सत्तेतून बाहेर पडण्याचे सूतोवाचही शिवसेनेकडून केले जात आहेत. मात्र शिवसेनेने फडणवीस सरकारचा पाठिंबा काढला तरी शिवसेनेतील 17 आमदार भाजपासोबच राहतील, असा गौप्यस्फोट काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांनी केला आहे.
एबीपी माझाला दिलेल्या एका विशेष मुलाखतीत नारायण राणे यांनी हे वक्तव्य केले आहे. "शिवसेना जरी सत्तेतून बाहेर पडली तरी भाजपाशी जवळीक असलेले 17 आमदार भाजपासोबतच राहतील, परिस्थिती अशीच राहिल्यास 2019 साली शिवसेनेच्या हातात फक्त काठी उरेल, झेंडा गायब झालेला असेल," असे ते म्हणाले.
यावेळी काँग्रेस आणि राष्ट्रवादीने काढलेल्या संघर्ष यात्रेवरही जोरदार टीका केली. काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे बडे बडे नेते सहभागी झालेल्या या यात्रेत संघर्षच दिसला नाही, असा टोला त्यांनी लगावला. त्याबरोबरच कोकणातल्या संघर्षयात्रेचे नेतृत्व आपण करणार नसल्याचेही त्यांनी सांगितले.
आपल्या भाजपा प्रवेशाबाबत येत असलेल्या वृत्तावरही नारायण राणेंनी भाष्य केले. "भाजपाकडून मला पक्षप्रवेशाची ऑफर आहे. पण सध्या तिच्यावर विचार केलेला नाही," असे ते म्हणाले. काँग्रेसमध्ये नाराज असलेल्या नारायण राणेच्या भाजपा प्रवेशाबाबत गेल्या काही काळापासून सातत्याने बातम्या येत आहेत. मात्र त्यांच्या या प्रवेशाविषयी अद्याप ठोस निर्णय होऊ शकलेला नाही.