मला एका गोष्टीचे अतिशय वाईट वाटते, की स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल जो जाज्वल्य अभिमान बाळासाहेब ठाकरे यांना होता, कुणीही एक शब्दही बोलला तर त्याला चपखल अशा पद्धतीचं उत्तर मिळत होतं. ते कृतीतुनही मिळत होतं आणि शब्दांतूनही मिळत होतं. मत्र आता, हिंगोलीत राहुल गांधी सावरकरांबद्दल एवढं नीच बोलतात आणि त्यांच्या गळात गळे टाकून आदित्य ठाकरे जेव्हा पदयात्रा करतात... बरं आमचं सोडून द्या, मी विचार केल्यावर मला असं वाटतं, की त्या ठिकाणी स्वर्गात बाळासाहेब ठाकरेंना काय वाटत असेल? जेव्हा ते बघत असतील, की त्या राहुल गांधीसोबत आदित्य ठाकरे पदयात्रा करतायत, अशा शब्दात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आदित्य ठाकरेंवर निशाणा साधला. ते शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीदिनानिमित्त शिवसेनेच्या (एकनाथ शिंदे गट) वतीने आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात बोलत होते.
काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेत नुकतीच आदित्य ठाकरे यांनी हजेरी लावली होती. यानंतर आदित्य ठाकरे आणि राहुल गांधींच्या गळाभेटीचे फोटोही सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल झाले होते. याच पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांनी आदित्य ठाकरेंवर निशाणा साधला आहे. "ठीक आहे तुमचं-आमचं पटलं नसेल. तुम्ही विचार सोडला म्हणून आम्ही तुम्हाला सोडलं. पण तुम्ही आम्हाला सोडा, आम्हाला शिव्या द्या. पण स्वातंत्र्यवीर सावरकरांना शिव्या देणाऱ्यांना तुम्ही जवळ करत असाल तर, बाळासाहेबांशी नात सांगण्याचा तुम्हाला अधिकार आहे का?" असा सवालही यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी आदित्य ठाकरे यांना केला आहे.
फडणवीस म्हणाले, “बाळासाहेबांशी नातं हे रक्तानी होत नाही, ते विचाराने करावं लगातं. विचारांचं नातं हे बाळासाहेबांशी खरं नातं आहे. आणि जो-जो विचारांचं नात याठिकाणी सांगेल, तोच खरा बाळासाहेबांचा अनुयायी असेल, म्हणून तर याठिकाणी बाळासाहेबांची शिवसेना तयार झाली. कारण हे विचाराचं नातं आहे. रक्तानं कदाचित एकनाथ शिंदे बाळासाहेबांचे कुणी नसतील, पण विचारानं एकनाथ शिंदे हे बाळासाहेब ठाकरेंचा खरा वारसा चालवत आहेत. म्हणूनच हे त्यांच्या कुटुंबातील आहेत”.
एवढेच नाही, तर “बाळासाहेब ठाकरे यांना मानवंदना देताना आपण निर्धार करूया की, ज्या विचारांनी बाळासाहेबांनी शिवसेना उभी केली, तो विचार मोडू दिला जाणार नाही. काय वाटेल ते झालं तरी तो विचार जिवंत राहिल आणि जोपर्यंत सावरकरांना आपमानित करणारे देशामध्ये आहेत, या सगळ्या अपमानित करणाऱ्यांचा विचार जमीनीत गाढल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही, असा निर्धार आपण सर्व जण करू, असेही देवेंद्र फडणवी यावेळी म्हणाले.