मुंबई : विधानसभेतील ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी विधिमंडळातील कामकाजाबाबत नाराजी व्यक्त करत आपली अस्वस्थता प्रकट केली आहे. राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे हा शेवटचा आठवडा आहे. या संपूर्ण अधिवेशनात आपल्याला विधानसभेत बोलू दिले नसल्याचा आरोप जाधव यांनी केला आहे.
विधानसभेतून मंगळवारी बाहेर पडताना विधानभवनाच्या पायऱ्यांवर डोके टेकवत ते नतमस्तक झाले आणि आपल्या भावना त्यांनी बोलून दाखवल्या. आता या सभागृहात येण्याची इच्छा नाही, असे सांगत जाधव विधानभवनातून बाहेर पडले. जाधव म्हणाले की, आज मी सभागृहातून बाहेर पडलो. उद्या गुढीपाडवा आहे. त्यानंतर तीन दिवस सभागृह आहे. मी गावी निघालो आहे आणि पुन्हा येणार नाही. कारण परत येण्याची इच्छा राहिली नाही.
भास्कर जाधव सहसा सभागृह चुकवत नाहीत. नियमित ते सभागृहात बसून कामकाजात सहभाग घेतात. मात्र आपल्याला जाणीवपूर्वक सभागृहात बोलू दिले जात नाही, विषय मांडू दिले जात नाहीत. नियमाने बोलण्याचा अधिकार असून, सभागृह कायद्यानुसार चालवावे, असे आपले म्हणणे आहे, असे जाधव यांनी सांगितले.