ऑनलाइन लोकमतवर्धा, दि. 10 - उपचारादरम्यान मृत्यू झाल्याच्या खात्रीने कुटुंबियांनी कापडात गुंडाळून मृतदेह घरी आणला. सर्व नातेवार्इंकांना निधनाचा निरोपही देण्यात आला. घरी अंत्यसंस्काराची तयारीही केली. मृतदेहावरील कापड काढताच तो मृतदेह श्वास घेत असल्याचे दिसले, अन् एकच खळबळ उडाली. ही वार्ता हवेसारखी शहरात पसरली. सोमवारी पुलगाव येथील गांधी चौक परिसरात घडलेही ही घटना सर्वत्र चर्चेचा विषय ठरली आहे. दिनेश पारधेकर हे जीवंत असल्याची माहिती लगेच त्यांच्या कुटुंबियांनी येथील ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. गोपान नारळवार यांना दिली. त्यांनी धाव घेऊन तपासणी करताच सदर इसम जिवंत असल्याचे स्पष्ट केले. यामुळे दिनेश पारधेकर यांना उपचाराकरिता परत सेवाग्राम रुग्णालयात दाखल केले. दिनेश पारधेकर यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांच्या कुटुंबियांनी त्यांना नागपूर येथील रुग्णालयात दाखल केले होते. येथे उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाल्याची खात्री त्यांच्या नातलगांना आली असता त्यांनी रुग्णालयातून सुटी घेत दिनेश यांचा मृत्यू झाल्याची माहिती त्यांच्या नातलगांना दिली. सोमवारी सकाळी त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार असल्याचे काळविण्यात आले. दिनेश यांचा मृत्यू झाला असे गृहीत धरून त्यांच्या कुटुंबियांनी मृतदेह पुलगाव येथील त्यांच्या निवासस्थानी आणला. सकाळी सर्व नातलग व परिसरातील नागरिक गोळा झाले. त्यांच्या अंत्यविधीची तयारी सुरू असताना अचानक एका नातलगाने त्यांच्या अंगावरील कापड दूर करताच त्यांचा श्वास सुरू असल्याचे दिसून आले.मृतक श्वास घेत असल्याची माहिती परिसरात वाऱ्यासारखी पसरली. ह्यमेलेला जिवंत झालाह्ण असे म्हणत परिसरातील नागरिकांनी दिनेश पारधेकर यांच्या घराकडे धाव घेतली. त्यांच्या कुटुंबियांनीही याची खात्री करण्याकरिता येथील ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक गोपाल नारळवार यांना बोलाविले. त्यांनी दिनेश पारधेकर यांचा मृत्यू झाला नाही तर ते अद्याप जिवंत असल्याचे सांगितले. त्यांच्या नाडीची गती ७२ असल्याचे त्यांनी सांगितले. अशा स्थितीत त्यांना पर्याप्त मात्रेत आॅक्सीजन दिल्यास त्यांचे पाण वाचणे शक्य असल्याचेही डॉक्टरांनी सांगितले. दिनेश जिवंत असल्याची माहिती त्यांच्या कुटुंबियांना मिळताच त्यांनी १०८ च्या मदतीने दिनेश पारधेकर यांना सेवाग्राम येथील रुग्णालयात उपचाराकरिता नेले. येथे त्यांच्यावर उपचार सुरू आहे. अंत्यसंस्काराकरिता नातेवाईक, मित्रपरिवार व शहरातील नागरिक जमा झाले होते. साऱ्यांच्या तोंडी मेलेला जिवंत झाला असे वाक्य असून आश्चर्य व्यक्त करण्यात येत असल्याचे दिसून आले.
... आणि मृतदेह श्वास घेऊ लागला
By admin | Published: October 10, 2016 7:04 PM