नागपूर : आंतरराष्ट्रीय ख्यातीचे पोर्ट्रेट कलावंत वासुदेव कामत यांनी यावेळी पोर्ट्रेटचे प्रात्यक्षिक करुन दाखविले. मौक्तिक काटे हा चित्रकारच त्यांनी मॉडेल म्हणून निवडला. उपस्थितांमध्ये प्रचंड कुतूहल आणि औत्सुक्याचे वातावरण होते. पांढरा कॅनव्हास आणि हातात ब्रश घेऊन कामत काही काळ स्तब्ध राहिले. त्यामुळे उपस्थितांमध्ये जरा अस्वस्थताही आली. पण काही काळाने कामतांनी पिवळ्या रंगात ब्रश बुडविला आणि कॅनव्हासवर स्ट्रोक मारला. टाळ्यांचा कडकडाट झाला. यानंतर मात्र तब्बल पाऊण तास कामत आणि ब्रशचे फटकारे यातून वेगवेगळ्या आकृत्यांची घुसळण सुरु झाली. काय सुरु आहे, ते कळत नव्हते. समोर मॉडेल बसला आहे आणि त्याचे पोर्ट्रेट काढताना कामत नेमके त्याच्या पोर्ट्रेटपर्यंत कसे पोहोचणार याचे कुतुहल साऱ्यांना होते. तब्बल २० मिनिटे मात्र त्यांच्या कॅनव्हासवरच्या आकृत्यांचा अर्थच सामान्य रसिकांना कळत नव्हता. अर्ध्या तासाने मात्र आकृती उलगडत गेली. एकातून दुसरी आणि दुसरीतून तिसरी. अनेक आकारांच्या घुसळणीतून या सर्व आकारांचे अद्वैत होऊ लागले. प्रत्येक लहानमोठ्या आकृत्या एकमेकात सरमिसळ होत गेल्या आणि मॉडेलचा चेहरा समोर आला. त्यानंतर त्यांनी त्यात रंगांचा प्रयोग केला. विशेषत: केवळ मॉडेलचे पोर्ट्रेट न काढता त्यांनी त्यांच्या शैली आणि वैशिष्ट्याप्रमाणे त्यात वातावरणाचा अनुबंध आणि नेमकेपणाने चेहऱ्यावरचे भाव साकारले. त्यांचे पोर्ट्रे पूर्ण झाल्यावर आपसूकच टाळ्यांचा कडकडाट झाला. (प्रतिनिधी)या प्रदर्शनाने वैदर्भीय कलावंतांना प्रेरणा मिळेल : विजय दर्डा नागपूर श्लोक हे प्रदर्शन दर्जेदार कलाकृतींनी भरले आहे. यात निवडक कलाकृती ठेवण्यात आल्या आहेत आणि रंगाच्या, कुंचल्यांच्या माध्यमातून त्या आपल्याशी संवाद साधतात. अनेक कलाकृतींनी आज मला अंतर्मुख केले. सर्जनशील कलावंत किती सूक्ष्म पातळीवर विचार करतो, याचा प्रत्यय या प्रदर्शनातून येतो. या प्रदर्शनातून वैदर्भीय कलावंतांना नक्कीच प्रेरणा मिळेल, असा विश्वास लोकमत वृत्तपत्र समुहाच्या एडिटोरिअल बोर्डाचे चेअरमन खासदार विजय दर्डा यांनी व्यक्त केले. याप्रसंगी त्यांनी चित्रकार रजा यांचीही एक आठवण सांगितली. काही दिवसांपूर्वी वय वर्षे ९४ असलेल्या चित्रकार रजा यांची भेट घेण्यासाठी मी गेलो. वृद्धत्वामुळे त्यांना आता डोळ्यांनी नीट दिसत नाही. पण तुम्ही चित्र कसे काढता, असे त्यांनी विचारल्यावर मला त्यांनी त्यांच्या हाताची बोटे दाखविली. आयुष्यभर चित्रांचा अभ्यास असल्याने डोळ्यांनी दिसत नसले तरी चित्र काढतो, असे ते म्हणाले. मुळात यामागे त्यांचा रियाज होता. माझ्याशी बोलतानाच त्यांची बोटे आणि ब्रश कॅनव्हासवर फिरत असताना त्यांच्या वकुबीने मी देखील अवाक झालो, अशी आठवण खा. विजय दर्डा यांनी सांगितली. श्लोक हा कलावंतांना प्रोत्साहन देणारा उपक्रम : शीतल ऋषी दर्डा २००८ साली या श्लोक प्रदर्शनाला प्रारंभ केला. राज्यातील अनेक प्रतिभावंत कलावंतांना प्लॅटफार्म मिळत नाही. ती संधी त्यांना मिळायला हवी या उद्देशाने ही संकल्पना मी प्रत्यक्षात आणली. आज या प्रदर्शनातून अनेक नामवंत कलावंत तयार झाले आणि ते पुढे गेले, याचेच समाधान मोठे आहे. श्लोक हा कलावंतांना प्रोत्साहन देणारा आणि मोठे करणारा उपक्रम आहे, असे मत श्लोकच्या संचालक शीतल ऋषी दर्डा यांनी व्यक्त केले. बालपणापासूनच मला कलामाध्यमाची आवड होती. त्यात चित्रकलेची आवड होती. मी स्वत: कलावंत झाले नाही पण कलेची आस्वादक मात्र आहे. अनेकांना चित्र माध्यमात समोर जाण्यासाठी योग्य व्यासपीठ, रंगपीठ हवे असते. ते अनेकांना मिळत नाही. ग्रामीण भागातल्या प्रतिभावंतांना हे रंगपीठ देण्याचा माजा संकल्प या प्रदर्शनांच्या श्रृंखलेने पूर्ण होतो आहे. त्यामुळे मुंबई, पुणे, औरंगाबाद, नाशिक आणि नागपूरनंतर आता हे प्रदर्शन गोवा येथेही स्थानिक कलावंतांना घेऊन आयोजित करण्यात माझा प्रयत्न आहे. या प्रदर्शनासाठी आता मुंबईच्या नॅशनल गॅलरी आॅफ बॉम्बेने आता पुढाकार घेतला आहे. याचा आनंद वाटतो.
...अन् कॅनव्हासला अर्थ मिळाला
By admin | Published: January 12, 2015 1:07 AM