मुंबई : विधान परिषद निवडणुकीसाठी आयारामांना तिकीट दिल्यामुळे नाराज झालेल्या भाजपा पदाधिकाऱ्यांना गुरुवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेटीसाठी बोलावले होते. मात्र, काही उत्साही पदाधिकाऱ्यांनी भेटीचा तपशील माध्यमांना कळविला. या प्रकारानंतर मुख्यमंत्र्यांनी नाराजांना बाजूला सारत नियोजित दौऱ्यासाठी राजधानी दिल्ली गाठणे पसंत केले. विधान परिषदेसाठी पक्षातील निष्ठावंतांना डावलून अलीकडेच भाजपात दाखल झालेले प्रवीण दरेकर, आर. एन. सिंह आणि प्रसाद लाड यांना उमेदवारी दिल्याने पक्षात नाराजी होती. विशेषत: सिंह यांच्या उमेदवारीमुळे भाजपातील उत्तर भारतीय पदाधिकारी, कार्यकर्ते संतप्त झाले होते. या कार्यकर्त्यांनी बुधवारी प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांची भेट घेत आपल्या भावना कळविल्या होत्या. यावर पक्षाचा निर्णय झाला आहे, मात्र आपली नाराजी मुख्यमंत्र्यांच्या कानावर घातली जाईल, असे आश्वासन दानवे यांनी दिले होते. मुख्यमंत्र्यांकडून नाराजांना गुरुवारी सकाळी साडेदहा वाजता भेटीसाठी वर्षा बंगल्यावर पोहोचण्याचे संदेश गेले. या भेटीत कार्यकर्त्यांच्या भावना समजून घेणे आणि त्यांच्यासोबत चर्चा अपेक्षित होती. या बैठकीची कुणकुण माध्यमांना लागली आणि माध्यमांचे प्रतिनिधी वर्षाबाहेर हजर झाले. काही उत्साही पदाधिकाऱ्यांनीच माध्यमांना या नियोजित भेटीची माहिती कळविली. कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेणे आणि चर्चेच्या माध्यमातून नाराजी दूर करण्यासाठी बोलावलेल्या भेटीला मिळालेली आगाऊ प्रसिद्धी मुख्यमंत्र्यांना रुचली नाही. त्यामुळे मुख्यमंत्री दिल्लीला रवाना झाले. सकाळी ९ च्या सुमारास आम्हाला वर्षावर येण्याची सूचना मिळाली. मात्र, अनेक कार्यकर्ते दिलेल्या वेळेत वर्षा बंगल्यावर पोहोचू शकले नाहीत. त्यामुळे मुख्यमंत्र्यांची भेट हुकल्याची सारवासारव एका पदाधिकाऱ्याने केली. (प्रतिनिधी)
...अन मुख्यमंत्री नाराजांना भेटलेच नाहीत
By admin | Published: June 03, 2016 3:11 AM