चंद्रपूर : सर्वसामान्य जनतेच्या आशा-आकांक्षा सुधीर मुनगंटीवारांच्या मंत्रिपदाने वाढल्या आहेत. केवळ मतदार संघाचेच नव्हे तर, जिल्ह्याचे रूप त्यांनी पालटावे, अशा अपेक्षा जनतेने व्यक्त केल्या आहेत.‘लोकमत’ने सर्वसामान्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या असता अनेकांच्या मनात त्यांच्याबद्दलचा जिव्हाळा आणि प्रेम जाणवले. मूलमधील भाजपाचे माजी जिल्हा उपाध्यक्ष मोती टहलियानी म्हणाले, मागील पाच वर्षे मंत्री नसताना मूल तालुक्याचा विकास साधण्यासाठी विशेष प्रयत्न सुधीर मुनगंटीवार यांनी केला. यावेळी केंद्रात व महाराष्ट्रात भाजपाची सत्ता असल्याने ते क्षेत्राचा विकास साधतील असा आत्मविश्वास आहे. मूल पंचायत समितीचे माजी सभापती चंद्रकांत गांगरेड्डीवार म्हणाले, तालुक्यात सिंचनाचा प्रश्न शेतकऱ्यांना सतावतो आहे. त्यामुळे ह्युुमन प्रकल्प, गोसिखुर्द प्रकल्प मार्गी लावून त्यांनी तालुक्यात सिंचनाची सोय करावी व मूल तालुका सुजलाम सुफलाम करावा.जिल्हा भाजपा युवा मोर्चाचे माजी अध्यक्ष चंदू मारगोनवार म्हणाले, विकासाचा महामेरु म्हणून आ. सुधीर मुनगंटीवार यांची ख्याती आहे. मंत्री झाल्यावर त्यांची जबाबदारी वाढली असून सर्व सामान्याचा न्याय देण्यासाठी विशेष तत्पर राहतील. जिल्हा परिषद अध्यक्ष संध्या गुरुनुले म्हणाल्या, विकासाची तळमळ व काम करण्याची तत्परता सुधीर मुनगंटीवार यांच्या नसानसात भिनली आहे. त्यामुळे विधानसभेत त्यांना संसदपटू उपाधीने गौरविण्यात आले आहे. मंत्री झाल्याने विकासाला प्राधान्य देतील असा विश्वास आहे. आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी शुक्रवारी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर सामान्य नागरिकांनी प्रतिक्रीया व्यक्त केल्या. मूल येथील नामदेव काळे म्हणाले, सुधीर मुनगंटीवार यांनी जात, पक्ष भेद न करता सर्वसामान्य नागरिकांची कामे केली आहेत. त्यांच्या कामांमुळे सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळाला असून, ते मंत्री झाल्याने गरिबांच्या मागण्यांना न्याय मिळेल. मूल येथील अशोक गावतुरे म्हणाले, सर्वसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी त्यांचा नेहमी प्रयत्न राहिला आहे. त्यांनी जातीपलीकडे जाऊन राजकारण केले. त्यामुळे सर्वसामान्यांचे ते लाडके आहेत.मूल येथील कमलाकर नवघडे म्हणाले, सर्वसामान्यांचा नेता म्हणून सुधीर मुनगंटीवार यांची ओळख आहे. ते सर्व सामान्यांच्या प्रश्नाला न्याय देत आले. पुढेही ते सर्वसामान्यांच्या प्रश्नाला प्रथम स्थान देतील. मूल येथील मोती टहलियानी म्हणाले, पाच वर्षे मंत्री नसतानासुध्दा त्यांनी मूल तालुक्याच्या विकासाठी प्रयत्न केलेत. ते मंत्री झाल्याने तालुक्यातील विकास कामांना गती मिळणार आहे. चंद्रपूर येथील माणिक नरडे म्हणाले, सुधीर मुनगंटीवार हे विदर्भातील नेते असल्याने त्यांना विदर्भातील समस्यांची चांगली जाण आहे. सिंचन प्रकल्प, प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न त्यांच्या मंत्री होण्यामुळे सुटण्याची आशा आहे. प्रविण इटनकर म्हणाले, जिल्ह्यातील नेत्याला कॅबीनेट मंत्रीपद मिळाल्याने जिल्ह्याचे वजन वाढले आहे. गोरगरिबांच्या समस्या शासनस्तरावर जाऊन त्यांचा तत्काळ निपटारा होईल. प्रमोद विश्वकर्मा म्हणाले, जिल्ह्यात प्रदूषण ही सर्वात मोठी समस्या आहे. तर गुन्हेगारीनेही तोंड वर केले आहे. मंत्री पद जिल्ह्याला मिळाल्याने प्रदूषण व गुन्हेगारीवर आळा बसेल, अशी आशा आहे. भाजपाचे बल्लारपूर येथील ज्येष्ठ नेते चंदनसिंह चंदेल म्हणाले, आज आमच्यासाठी निश्चितच सोनियाचा दिन ठरलाय. मुनगंटीवार हे दिलेली आश्वासन नक्कीच पूर्ण करतील, असा ठाम विश्वास आहे.
अन् सुनेने केली स्वप्नपूर्ती
By admin | Published: November 01, 2014 1:36 AM