मनीषा म्हात्रे , मुंबईलहान मुलांवर अत्याचार करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाईसाठी केंद्र सरकारने पॉस्को कायदा आणला. या कायद्याच्या चाकोरीत पोलिसांनी एका आरोपीला गजाआड केले. तथापि, नराधमाच्या वासनेची बळी ठरलेली एक अल्पवयीन मुलगी सध्या मरणासन्न अवस्थेत आयुष्याची एकेक घटिका मोजत आहे. या घटनेनंतर आई-वडिलांनीही तिला नाकारल्याने डोंगरी बालसुधारगृहात अनाथ म्हणून आयुष्य जगण्याची वेळ तिच्यावर आली आहे.घाटकोपर पश्चिमेकडील परिसरात आई-वडिलांसह राहणाऱ्या १३वर्षीय नेहाने (नाव बदललेले आहे) घरच्या हालाखीच्या परिस्थितीमुळे या वर्षीच शिक्षण सोडले. वडिलांचा त्याच परिसरात सलूनचा व्यवसाय आहे. एप्रिल महिन्यात मुलीच्या मामाचा मुलगा राजेंद्रप्रसाद शर्मा नेहाच्या वडिलांच्या व्यवसायात मदतीसाठी आला. आई-वडील कामासाठी बाहेर गेल्यानंतर नेहा घरी एकटीच असायची. याचा फायदा घेत दुपारी घरी कोणीही नसताना राजेंद्रप्रसादने तिच्यावर बलात्कार केला. या प्रकाराची वाच्यता करू नये, म्हणून तिला त्याने धमकावले. त्यानंतर या नराधमाने तिच्यावर दोन ते तीन वेळा बलात्कार केला. वारंवार होत असलेल्या अत्याचाराला कंटाळून तिने झालेला प्रकार आईला सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र तिनेही नेहाला दम भरत त्याकडे दुर्लक्ष केले.उत्तर प्रदेश येथील जमुर्या खुर्द गावचा रहिवासी असलेल्या राजेंद्रप्रसादचा विवाह ठरला होता. नेहा लग्नासाठी त्याच्या गावी गेली होती. तेव्हा राजेंद्रप्रसादचा जिवलग मित्र प्रल्हाद नेहाला भेटला. हतबल झालेल्या नेहाने मदतीच्या अपेक्षेने प्रल्हादकडे राजेंद्रप्रसादच्या कृत्याचा पाढा वाचला. अशावेळी मदत करण्याऐवजी प्रल्हादनेही तिच्यावर अत्याचार केला. या घटनेने नेहा पूर्णत: खचून गेली. सगळेच मार्ग बंद झाल्याने तिने सर्वांशी बोलणे सोडले. या घटनेला पाच महिने उलटले, तेव्हा तिला वेदना जाणवू लागल्या. कुटुंबीयांनी जवळच्या रुग्णालयात नेले असता, ती पाच महिन्यांची गर्भवती असल्याचे तपासणीत समोर आले. घटनेनंतर नेहाच्या कुटुंबीयांनी तिला घाटकोपर पोलीस ठाण्यात आणून गुन्ह्याला वाचा फोडण्यासाठी मदत केली. या प्रकरणी दोन्हीही आरोपींना अटक करून अधिक तपास सुरू असल्याची माहिती घाटकोपर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक व्यंकट पाटील यांनी दिली.या प्रकरणाची सखोल चौकशी करून योग्य ती कारवाई केली जाईल, अशी माहिती परिमंडळ ७चे पोलीस उपायुक्त विनयकुमार राठोड यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.
...आणि तिला कुटुंबीयांनी नाकारले
By admin | Published: August 19, 2015 1:17 AM