२00६ मध्ये रेल्वेच्या सिरियल ब्लास्टमधील मृतांच्या नातेवाईकांना मिळवून दिली ५ लाखांची मदत
दिवा-सावंतवाडी पॅसेंजर ट्रेनला अपघात
मुंबई - पश्चिम रेल्वे मार्गावर २00६ मध्ये सिरियल ब्लास्ट झाला आणि मुंबईत एकच हाहाकार उडाला. यात तब्बल २00 पेक्षा अधिक प्रवाशांना आपले प्राण गमवावे लागले. अनेकांनी तर आपल्या घरातील कर्ताधर्ता व्यक्तीही गमावला. या घटनेचे गांभीर्य ओळखून रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आलेल्या आर्थिक मदतीत त्यावेळेचे रेल्वेमंत्री लालू प्रसाद यादव यांनी भरघोस वाढ केली आणि आपला उदारपणा दाखवून दिला. मात्र हाच उदारपणा रेल्वेमंत्री मल्लिकार्जुन खर्गे यांनी दिवा-सावंतवाडी पॅसेंजर ट्रेनला झालेल्या अपघातात मृत्यूमुखी पडणार्या नातेवाईकांच्या बाबतीत दाखविला नाही. त्यामुळे रेल्वेमंत्र्यांबाबत प्रचंड नाराजी व्यक्त केली जात आहे. ११ जुलै २00६ रोजी अकरा मिनिटांच्या अंतराने पश्चिम रेल्वेच्या सात स्थानकांवर बॉम्बस्फोट झाले. या स्फोटात २0९ जणांचा मृत्यू तर ७00 जण जखमी झाले. रेल्वेच्या इतिहासातील ही सर्वात मोठी घटना होती. तेव्हा मुख्यमंत्री असलेले विलासराव देशमुख यांनी मृतांच्या नातेवाईकांना एक लाख रुपयांची मदत जाहीर केली. या घटनेची माहीती मिळताच त्यावेळी रेल्वेमंत्री असलेले लालू प्रसाद यादव यांनी मुंबई गाठली आणि घटनास्थळांना भेट दिली. सुरुवातीला रेल्वेतर्फे मृताच्या नातेवाईकांना तातडीची ५0 हजार रुपये मदत देण्यात आली होती. मात्र ही मदत तोकडी असल्याने त्यांनी आपल्या अधिकार वापरुन त्यात साडे चार लाख रुपयांची वाढ केली आणि एकूण पाच लाख रुपये मृतांच्या नातेवाईकांना दिले. तर घरातील कर्ताधर्ता व्यक्ती गमावलेल्यांना त्यांनी नोकरीही देण्याचा निर्णय घेतला. मृतांच्या नातेवाईकांना पाच लाख रुपयांची मदत मिळाली का नाही याचा पाठपुरावाही त्यांच्याकडून त्यावेळी करण्यात आल्याचे रेल्वेतील सूत्रांकडून सांगण्यात आले. तर नोकरी देण्याबाबत कुठले निकष आहेत याची पडताळणीही त्यांनी केली आणि तशी मदतही त्यांनी केली. लालू प्रसाद यादव यांनी त्यावेळी आपला अधिकार वापरुन आर्थिक मदतीत वाढ करुन मदत दिल्याची ती पहिलीच घटनाही असल्याचे रेल्वेतील सूत्रांनी सांगितले. मात्र दुदैवी कोकणवासियांच्या बाबतीत अशी आर्थिक मदत त्यांना मिळालीच नाही. कोकणात जाणार्या पॅसेंजर ट्रेनला अपघात झाला आणि या अपघातात तब्बल २२ प्रवाशांना आपले प्राण गमवावे लागले. कोकण रेल्वेवर झालेल्या या अपघातात अनेकांना आपल्या घरातील कर्ताधर्ता व्यक्तीही गमवावा लागला. मात्र त्याची जराही तमा न बाळगता रेल्वे प्रशासनाकडून अवघे दोन लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली. रेल्वेमंत्र्यांनी घटनास्थळी भेट देऊन आणि त्याची माहीती घेतल्यानंतरही नुकसान भरपाई वाढवून देण्याबाबत साधा ब्र देखिल न काढल्याने लालू प्रसाद यादव यांच्याकडून त्यांनी धडा घ्यावा, अशी मागणीच आता कोकणवासियांकडून केली जात आहे.