मुंबई : लोकसभा निवडणुकीदरम्यान आलेल्या मोदी लाटेने दिग्गजांचे पानिपत केले. आणि राज्यातील विधानसभा निवडणुकीदरम्यानही पूर्णपणे बहुमत हासील करण्यासाठी भाजपाने मोदी नावाचा चेहरा पुढे केला. त्यासाठी भाजपाने खेळी खेळून ‘आरं, कुठं नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा?’ या जाहिरातींचा फंडा पुढे केला खरा. मात्र आता व्हॉट्सअॅप युजर्सने त्यांचीच खेळी त्यांच्यावर पलटवत त्यांना महाराष्ट्राचे स्थान त्यांच्याच भाषेत दाखवून दिले आहे.विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मैदानी सभा आणि प्रचार-प्रसार रंगत असला तरी सोशल नेटवर्क साइट्सवर प्रचार-प्रसाराने भलताच वेग घेतला आहे. आता तर श्वासागणिक इथल्या प्रचाराचा फंडा बदलत असून, भाजपाने मतदारांना आकर्षित करण्यासाठी छोट्या पडद्याहून ‘आरं, कुठं नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा?’ या जाहिरातींचा धुमाकूळ सुरू केला. छोट्या पडद्यावरील या जाहिरातींनी व्हॉॅट्सअॅपची जागा घेतली आणि नंतर मात्र या जाहिरातींची नेटकरांनी चांगलीच टर उडवणे सुरू केले. आता तर या फंड्याने कहर केला असून, नेटकरी त्या मेसेजने विटले आहेत. विशेषत: त्यांच्याच भाषेत नेटकऱ्यांनी त्यांना उत्तरे देण्यास सुरुवात केली असून, यातून महाराष्ट्राचे स्थान दाखवून दिले आहे.गेल्या दोन दिवसांपासून व्हॉट्सअॅपवर... बुमरवर आता स्टीकर पण मिळत नाही - अरे कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा; रोज डव्ह साबणाने आंघोळ करणारा अॅडमिन आज व्हिम बार साबणाने आंघोळ करतोय - अरे कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा़ आज मी लॅपटॉप सुरू करून गुगलवर महाराष्ट्र सर्च केलं, तर काय आश्चर्य... अहो, चक्क गुगल स्वत: वैतागून विचारत होता... अरे कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा; काल रात्रभर नीट झोपच नाही लागली, डोक्यात एकच विचार येत होता - अरे कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा; अरे महाराष्ट्र म्हणजे काय काड्यांची पेटी आहे का - अरे कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा़ पूर्वी पोरं फोन फक्त बोलायला वापरायचे, आता ही पोरं अख्खा दिवस व्हॉट्सअॅपवर राज्याच्या नावाने गळे काढताहेत - अरे कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा़ वडापाववर समाधान माननारी गर्लफ्रेंड आता बर्गरशिवाय काय खात नाही - अरे कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा, असे अनेक मेसेज फिरत आहेत. (प्रतिनिधी)
...आणि नेटकऱ्यांनी ‘त्यांना’ महाराष्ट्र दाखवला
By admin | Published: October 06, 2014 5:33 AM