ऑनलाइन लोकमतअमरावती, दि. २५ : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विमान सोमवारी अमरावतीत लँड झालेच नाही. वैमानिकाने बेलोरा धावपट्टीवर विमान उतरविण्याचा सातत्याने प्रयत्न केला. मात्र, ढगाळ वातावरण आणि रेन फॉलचा इशारा, एटीएस टॉवर यंत्रणेकडून वैमानिकाला मिळाला. त्यामुळे मुख्यमंत्र्यांचे विमान आकाशात तीन घिरट्या मारून मुंबईला परतले.
माजी राज्यपाल, दिवंगत नेते रा.सू.गवई यांच्या स्मारक संकुलाच्या नियोजित भूमिपूजन कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सोमवारी २५ जुलै रोजी विमानाने अमरावतीला येणार होते. त्यांचा नियोजित दौरादेखील प्रशासनाला प्राप्त झाला होता. मुख्यमंत्री अमरावतीत केवळ ३५ मिनिटांसाठी येणार असल्याने त्यांच्या ‘मिनिट टू मिनिट’ दौऱ्याबाबत प्रशासन सज्ज होते. बेलोरा विमानतळ ते संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ या कार्यक्रम स्थळापर्यंत प्रचंड पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
सोमवारी मुंबईहून सकाळी ९ वाजून ५ मिनिटांनी दिल्ली येथील तनेजा एअर स्पेस कंपनीचे सहा आसनी चार्टर्ड विमान अमरावतीच्या दिशेने मुख्यमंत्र्यांना घेऊन निघाले. बेलोरा विमानतळ परिसरात सकाळी १० वाजताच्या सुमारास हे विमान पोहोचले. परंतु ‘लँडिंग’दरम्यान वैमानिकाला धावपट्टी दिसत नव्हती.
अमेय नामक वैमानिकाने नागपूर येथील विमानतळाच्या एटीएस टॉवर यंत्रणेशी संपर्क साधला. मुख्यमंत्र्यांचे विमान उतरविता येईल काय? याबाबत त्यांनी विचारणा केली. मात्र, अकोला राष्ट्रीय महामार्ग परिसरात रेन फॉल आणि ढगाळ वातावरण असल्यामुळे धावपट्टीवर विमान उतरविणे धोकादायक असल्याचा इशारा एटीएस टॉवर यंत्रणेकडून वैमानिकाला देण्यात आला. विमानाचे ‘लँडिंग’ अतिशय धोकादायक ठरेल, असे संकेत वैमानिकांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले.
तरीसुद्धा वातावरण स्वच्छ होण्याची प्रतीक्षा करण्यासाठी मुख्यमंत्र्याच्या आग्रहाखातर वैमानिकाने आकाशात तीन वेळा घिरट्या मारल्या. अखेर १० ते १५ मिनिटे आकाशात घिरट्या मारल्यानंतर वैमानिकाने मुख्यमंत्र्यांना मुंबईला परत नेण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार हे विमान १२ वाजून १० मिनिटांनी मुंबई विमानतळावर पोहोचले. यानंतर मुख्यमंत्री थेट विधिमंडळात पोहोचल्याची माहिती मिळाली आहे. या विमानात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह त्यांचे स्वीय सहायक सुुिमत वानखडे असल्याची माहिती आहे. मुख्यमंत्र्यांना मुंबईहून घेऊन येणाऱ्या वैमानिकाशी सतत संपर्क ठेवून होतो. विमान ‘टेक आॅफ’ झाले तेव्हा अमरावतीत जोरदार पाऊस असल्याची माहिती अमेय नामक वैमानिकाला देण्यात आली. या वैमानिकाला बेलोरा विमानतळ धावपट्टीची इत्थंभूत माहिती असल्यामुळे निश्चिंत होतो. मात्र, अचानक ढगाळ वातावरण निर्माण झाले. वैमानिकाला धावपट्टी दिसत नव्हती. त्यामुळे मुख्यमंत्र्यांचे विमान उतरवता आले नाही. - एम.पी. पाठक, प्रबंधक, बेलोरा विमानतळ, अमरावतीअन पालकमंत्री, आमदारांचा विमान प्रवास हुकलामुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सोमवारी २५ जुलै रोजी दिवंगत नेते रा.सू. गवई यांच्या स्मारक संकुलाच्या भूमिपूजन कार्यक्रमाला येणार होते. हा कार्यक्रम आटोपल्यानंतर मुख्यमंत्र्यांसोबतच विमानात पालकमंत्री प्रवीण पोटे, आ. सुनील देशमुख, आ. यशोमती ठाकूर, आ. अनिल बोंडे आदी मुंबईला विधिमंडळात उपस्थित राहण्यासाठी जाणार होते. मात्र, मुख्यमंत्र्यांचे विमान ‘लँड’ न झाल्याने त्यांचा विमानप्रवास हुकला. पालकमंत्री प्रवीण पोटेंसह अन्य आमदारांना आता रेल्वेने मुंबई गाठावे लागणार आहे.