भडगाव : जवळच असलेल्या भोरटेक बु.।। येथील जि.प. शाळा खोलीची भिंत पडल्याच्या धक्यातून विद्यार्थी वर्ग अद्याप सावरलेला नाही. घटनेला दोन दिवस उलटल्यावर २९ रोजी सरपंच, ग्रा.पं. सदस्य, शिक्षक यांच्या आवाहनानंतर ७० पैकी ५९ मुलांनी शाळेत हजेरी लावली. मात्र शाळा सोयीनुसार कधी उघड्यावर तर कधी चावडीमध्ये तर कधी वि.का. सोसायटीच्या कार्यालयात भरविली जात असल्याने शैक्षणिक दृष्ट्या हा प्रवास कठीण ठरणार आहे.२७ रोजी झालेल्या पावसात अगोदरच जीर्ण झालेल्या शाळेची भिंत कोसळून ३ विद्यार्थी जखमी झाले होते. मुख्याध्यापक जयवंत सोनवणे यांचे प्रसंगअवधानामुळे मोठा अनर्थ टळला. या घटनेनंतर दुसऱ्या दिवशी शाळेत एकही विद्यार्थी पोहचला नाही किंवा पालकांची देखील विद्यार्थ्यांना शाळेत पाठवायची हिम्मत झाली नाही. यातून काही तरी मार्ग काढण्यासाठी ग्रा.पं. व शाळेच्या वतीने करण्यात विचार विनिमय करण्यात आला.
अनेकांच्या भेटीशाळा पडल्याचे वृत्त सर्वत्र पसरताच संपूर्ण जिल्हा प्रशासन जागे झाले. नी सारेच भोरटेकमध्ये दाखल झाले. यानंतर तीन खोल्या मंजूर झाल्या असल्या तरी त्या बांधून मिळेपर्यंत काय? असा प्रश्न आहेच.
सोयीनुसार शाळेचे ठिकाण
इयत्ता ४ थी पर्यंत शाळा या ठिकाणी आहेत. एकूण ७० विद्यार्थी शाळेत आहेत. शाळा पडल्यामुळे आता शाळा सोयीनुसार भरविण्याची वेळ शिक्षकांवर येऊन ठेपली आहे. कधी शाळेच्या प्रांगणात तर कधी चावडीमध्ये तर कधी वि.का. सोसायटीच्या कार्यालयात अशा मोठ्या सर्कशीतून शिक्षकांना विद्यार्थ्यांना शिक्षण द्यायचे आहे. त्यातच भर पावसाळ्यात निर्माण झालेल्या या परिस्थितीमध्ये सारे काही अडजेस्टमेंट करण्याची सवय शिक्षकाबरोबर विद्यार्थ्यांनादेखील करावी लागेल असेच काहिसे चित्र आज तरी समोर दिसत आहे.