- शेखर देसाई, लासलगाव, जि.नाशिक
निफाड तालुक्यातील खानगाव थडी येथील एक युवा शेतकरी बहिणीला भेटण्यासाठी मुंबईला गेला. पाहुण्यांच्या माध्यमातून मुंबईतील एका व्यापाऱ्याशी त्याचा परिचय झाला. व्यापाऱ्याने दिलेल्या सल्ल्याप्रमाणे गावाकडे येऊन त्याने आपल्या शेतात शतावरी लावली अन् आज तो लखपती झाला. ही यशोगाथा आहे नाशिक जिल्ह्याच्या निफाड तालुक्यातील खानगाव थडीच्या दीपक पगारे या तरुण शेतकऱ्याची.
२८ वर्षीय शेतकरी दीपक पगारे यांची स्वत:च्या मालकीची पाच एकर शेती आहे. कांदे, सोयाबीन, ऊस अशी पारंपरिक पिके ते घेत होते. या माध्यमातून त्यांना वर्षाकाठी साधारणत: दोन लाख रुपयांचे उत्पन्न मिळत असे. दीपक मुंबईला असलेल्या बहिणीला भेटण्यासाठी गेले होते. तेथे मुंबईच्या काही व्यापाऱ्यांशी त्यांचा परिचय झाला. त्यापैकी एका व्यापाऱ्याने शतावरीचे पीक घेण्याचा सल्ला दिला. शतावरी या औषधी वनस्पतीविषयी दीपक यांना काहीही माहिती नव्हती. या व्यापाऱ्यानेच त्यांना सर्व माहिती देऊन विक्रीची पद्धतही समजावून सांगितली. विशेष म्हणजे, शतावरीचे बियाणेही त्यांनीच दिले.
दीपक यांनी शतावरी लावण्याचा निर्णय घेतला आणि कामाला सुरुवातही केली. सुरुवातीला व्यापाऱ्याने दिलेल्या बियाणांची नर्सरीतून रोपे तयार करून घेतली. जमिनीची नांगरट करून, कुळवाच्या २ ते ३ पाळ्या देऊन जमीन भुसभुशीत केली. एकरी ४ ते ५ गाड्या शेणखत घातले. त्यानंतर पाच फूट अंतराने एक फूट खोल व एक फूट रूंद असे चर खोदले. चरातील माती काढून निम्म्या मातीत शेणखत मिसळून ती त्याच चरात निम्म्याने भरली व उरलेली माती रोपे भरताना वापरली. एकरात ४३२ प्रमाणे सहा हजार रोपे अशी ३० हजार रोपे लावली. सुरुवातीला त्यांना एकरी ६० ते ७० हजार रुपये खर्च आला. पहिले ३-४ दिवस ठिबकने हलके पाणी दिले. लागवड केलेल्या दोन महिन्यांच्या रोपांना लागवडीनंतर चार महिन्यांनी तुरे येऊ लागले. तुऱ्यांनी डवरलेल्या कांड्या हेच शतावरीचं पीक.
आता दर दिवसाआड ते तोडणी करतात आणि मुंबईला त्याच व्यापाऱ्याकडे पाठवितात. साधारण वीस किलोचा एक बॉक्स असे दोन बॉक्स मिळून चाळीस किलो शतावरी नाशिक येथून ट्रान्स्पोर्टने पाठविली जाते. शंभर रुपये किलोच्या भावाने चाळीस किलोला सरासरी चार हजार रुपये त्यांना मिळतात. याप्रमाणे महिन्याला सहाशे किलो माल पाठविला जातो. त्याचे ६० हजार रुपये होतात, तर वर्षाला ७ ते ८ लाख रुपये मिळतात. चार वर्षांपासून त्यांना शतावरीचे उत्पन्न मिळत आहे. विशेष म्हणजे, या पिकासाठी त्यांना एकाच वेळी खर्च करावा लागला. त्यानंतर चार वर्षांत आतापर्यंत त्यांना एकूण २८ ते ३० लाखांचे उत्पन्न मिळाले आहे. दीपक पगारे यांनी आपल्या शेतात पाच एकरवर चार टप्प्यांत शतावरीची लागवड केली. संपूर्ण पीक लागवडीसाठी साधारणत: तीन लाख रुपयांपर्यंत खर्च आला. या पिकाला एकाचवेळी खर्च करावा लागतो.