ऑनलाइन लोकमत
शिरपूर, दि. २१ : शहरातील इदगाह नगरात शनिवारी रात्री दहा वाजेच्या सुमारास दोन गटात तुंबळ हाणामारी झाल्याची घटना घडली. या घटनेत तीन वाहनांची नासधूस झाली असून दोन्ही गटातील २५ जणांविरूद्ध दंगलीचा गुन्हा शिरपूर पोलीस स्टेशनला दाखल करण्यात आला आहे.
इदगाह नगरात भारतीबाई अमृत पाटील यांच्या घरासमोर दोन गटातील मुले रात्री उशिरापर्यंत गप्पा मारत बसले होते. त्यावेळी एका गटातील मुलाने दुसऱ्या गटातील उपस्थित असलेल्या मुलांना गस्तीसाठी पोलिस गाडी येईल म्हणून घरी चला असे सांगितले. त्याचा राग दुसऱ्या गटातील युवकांना आला. यादरम्यान, दोन्ही गट एकमेकांच्या अंगावर चालून आले. वाद विकोपाला गेला. परिणामी, याच ठिकाणी त्या दोनही गटात तुंबळ हाणामारी झाली़ या हाणामारीत काठ्या, दगड, विटा, काचेच्या बाटल्यांचा सर्रास वापर झाला. काही समाजकंठकांनी फिर्यादी भारतीबाई पाटील, सुरेखा मराठे, मनिषाबाई मराठे यांच्या घरात घुसून तोडफोड केली़ तसेच भांडण सोडत असताना शांताबाई देवचंद पाटील व अमृत पाटील या दोघांनादेखील मारहाण केली. या घटनेत शांताबाई पाटील यांच्या गळ्यातील ५ ग्रॅम वजनाची सोनसाखळी बळजबरीने हिसकावून नेली़
घटनेचे वृत्त कळताच अतिरिक्त जिल्हा पोलिस अधिक्षक चंद्रकांत गवळी, डीवायएसी योगीराज शेवगण, पोनि दत्ता पवार यांनी लागलीच परिस्थिती नियंत्रणात आणली़ घटनास्थळी पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे़
वारंवार हाणामारी़८ मे २०१६ रोजी एका समाजाच्या मुलाने दुसऱ्या समाजाच्या मुलीचे नाव घेतल्यामुळे शिरपूरात तणाव निर्माण झाला होता. या घटनेत या घटनेत पोलिस वाहनाच्या गाडीसह १० वाहनांची नासधुस झाली होती. तर २ वाहने जाळून टाकली होती़ याप्रकरणी आरोपींवर मोका अंतर्गत गुन्हा दाखल झाला होता.