ठाणे : महापालिका शाळेत शिक्षण घेणाऱ्या आहानाच्या चेहऱ्यावर आता हसू फुलणार आहे. आयुक्त संजीव जयस्वाल यांनी तिच्या नाकावरील सर्जरीची जबाबदारी घेतल्यानंतर मंगळवारी तिला येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. या वेळी आयुक्त स्वत: त्या ठिकाणी हजर होते. तसेच वडिलांची असलेली बेताची परिस्थिती लक्षात घेऊन आयुक्तांनी त्यांच्या उदरनिर्वाहासाठी एक रिक्षा भेट म्हणून दिली आहे. महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी मागील आठवड्यात आहानाच्या सर्जरीची जबाबदारी स्वीकारली होती. त्यानुसार, मंगळवारी सायंकाळी ते आहाना शर्मा या ६ वर्षांच्या मुलीला येथील खाजगी रुग्णालयात प्लास्टिक सर्जरीतज्ज्ञ डॉ. व्यंकटरामन यांच्याकडे घेऊन गेले होते. सोबत, तिचे आईवडीलही उपस्थित होते. आयुक्तांनी आहानाच्या आईवडिलांशी चर्चा केली. त्यांना समजावून सांगितले. त्यांना त्यांची संमती विचारली. ती मिळाल्यानंतर आयुक्त तिला डॉक्टरांच्या कक्षात घेऊन गेले. त्यानंतर, चर्चा झाल्यानंतर डॉक्टरांनी तिच्या नाकावर शस्त्रक्रिया होऊ शकते, असे सांगितले. ही चर्चा सुरू असतानाच अचानक आहानाला रडू कोसळले. सुरुवातीला हसतखेळत उत्तरे देणारी आहाना अचानक रडायला लागली. याचे तिच्या आईवडिलांनाही आश्चर्य वाटले. डॉक्टरांनी तिला समजावले. परंतु, ती रडतच होती. शेवटी, महापालिका आयुक्त उठले. ते तिच्याशी गप्पा मारायला लागले. तिच्याशी लहान मुलांसारखे खेळू लागले. तिच्यासाठी चॉकलेट मागवले. त्यांच्या या वागण्याने डॉक्टरांसह सगळेच अचंबित झाले. आहाना आणि महापालिका आयुक्त यांचा हा गोड संवाद काही वेळ सुरूच होता. या नंतर ती चक्क हसायला लागली. आयुक्त क्षणभर सर्वकाही विसरून तिच्यासोबत लहान मुलासारखे खेळत होते. कदाचित, त्यांना स्वत:चे बालपण आठवले असावे. (प्रतिनिधी)आहानाच्या वडिलांना रिक्षाची भेट...गेल्या तीनचार दिवसांपासून आहाना शर्मा या मुलीविषयी माध्यमांमधून सातत्याने वृत्ते प्रसिद्ध होत आहेत. महापालिका आयुक्त स्वत: आहानाच्या आणि आईवडिलांच्या सतत संपर्कात आहेत. मंगळवारी तिच्या वडिलांशी आयुक्तांनी संवाद साधून त्यांची विचारपूस केली. त्या वेळी ते दुसऱ्याच्या रिक्षावर ड्रायव्हर म्हणून काम करीत असल्याचे सांगितले. दरम्यानच्या काळात महापालिका आयुक्तांची दोस्ती फाउंडेशनशी चर्चा सुरू असतानाच सहजपणे हा विषय निघाला. त्या वेळी दोस्ती फाउंडेशनने तत्काळ आहानाच्या वडिलांना रिक्षा देण्याचे कबूल केले. यामुळे आहानाच्या कुटुंबीयांच्या रोजगाराचा प्रश्नही सुटणार आहे.
...अन त्यांच्यातले बालपण जागे झाले
By admin | Published: August 25, 2016 3:39 AM