उल्हासनगर : अंटेलिया येथील सभेला मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ येणार म्हणून नागरिकांनी एकच गर्दी करीत ३ तास भर उन्हात तात्काळत थांबले. मात्र योगी येणार नसल्याची माहिती स्टेजवरून शहरजिल्हाध्यक्ष प्रदीप रामचंदानी यांनी देताच नागरिकांनी काही मिनिटात मैदान खाली केले. कुमार आयलानी समर्थकांनी मात्र सभा रद्द झाल्याने नाराजी व्यक्त केली.
उल्हासनगरात प्रथमच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे कुमार आयलानी यांच्या प्रचार सभेला येणार म्हणून बहुतांश उत्तर भारतीय नागरिकांनी गर्दी केली होती. सभेची वेळ दुपारी अडीज वाजता असताना नागरिक भर दुपारी सभेला येऊन बसले होते. सुरक्षेच्या कारणास्तव नागरिकांना पाण्याच्या बॉटल नेण्यास पोलिसांनी मनाई केली होती. मात्र सभेला उशीर होत असल्याने, नागरिकांनी पाण्याच्या बॉटलची मागणी केली. त्यानंतर सायंकाळी ५ वाजण्याच्या दरम्यान सभेला मुख्यमंत्री योगी येणार नसल्याचे घोषित केले. नागरिकांनी काही मिनिटात मैदान खाली केले असून नेत्यांनी सभेच्या ठिकाणी योगी यांचे भाईंदर येथील भाषण ऐकविण्याचा प्रयत्न केला. मात्र नागरिकांनी यावर नाराजी व्यक्त केली. त्यांनी मंत्री रवींद्र चव्हाण, कुमार आयलानी यांचे भाषण न एकताच काढता पाय घेतला.
कुमार आयलानी यांच्या प्रचार सभेला मुख्यमंत्री योगी आले नसल्याने, भाजपा नेते रवींद्र चव्हाण, नरेंद्र राजांनी, शहरजिल्हाध्यक्ष प्रदीप रामचंदानी आदिनी सभेला उपस्थित असल्याची माफी मागितली. मुख्यमंत्री योगी यांच्या सभेवर आयलानी यांची भिस्त होती. मात्र योगी नं आल्याने, आयलानी कोंडीत सापडल्याचे बोलले जात आहे.