मुंबई:अंधेरी पूर्व विधानसभा पोट निवडणुकीतून अर्ज माघारी घेण्याच्या आजच्या शेवटच्यादिवशी भाजप उमेदवार मुरजी पटेल यांनी अर्ज मागे घेतला. भाजप प्रदेशाध्यक्ष चंदशेखर बावनकुळे यांनी याबाबत घोषणा केली. भाजप उमेदवाराने अर्ज मागे घेतल्यामुळे ऋतुजा लटके यांच्या विजयाचा मार्ग मोकळा झाला आहे. दरम्यान, यामुळे मुरजी पटेल यांचे समर्थक नाराज झाले असून, त्यांनी मनसेविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
संबंधित बातमी- प्रिय मित्र देवेंद्रजी, तुम्ही प्रतिसाद दिला; राज ठाकरेंचं भाजपसाठी आणखी एक पत्र
पक्षाने अर्ज मागे घेण्याचे आदेश दिल्यामुळे भाजप उमेदवार मुरजी पटेल यांचे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहेत. पटेल यांच्या कार्यकर्त्यांकडून राज ठाकरे आणि भाजपविरोधात घोषणाबाजी केली जात आहे. राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या पत्रानंतरच मुरजी पटेल यांना निवडणुकीतून माघार घ्यावी लागली, असे समर्थकांचे म्हणणे आहे. त्यामुळे, 'राज ठाकरे मुर्दाबाद', 'मनसे हाय हाय' अशी घोषणाबाजी पटेलांचे कार्यकर्ते करत आहेत.
पक्षाच्या आदेशावर पटेल काय म्हणाले?भाजपने मुरजी पटेल यांना उमेदवारी मागे घेण्याचे आदेश दिल्यानंतर, पटेल म्हणतात की, मला पक्षाने उमेदवारी दिली होती, आता माघार घ्यायला सांगितली. मी पक्षाचा आदेश मानणारा कार्यकर्ता आहे. पक्षाने निर्णय सांगताच एका मिनिटाचाही विचार न करता अर्ज मागे घेतला आहे, असं मुरजी पटेल म्हणाले.
भाजपला पराभव दिसत होता-जयंत पाटीलभाजपने जाहीर केलेल्या निर्णयावर प्रतिक्रिया देताना जयंत पाटील म्हणाले की, निवडणुकीच्या सुरुवातीपासूनच ऋतुजा लटके उभ्या राहू नये म्हणून प्रयत्न सुरू होते. त्यानंतर त्यांचा राजीनामा मंजूर होऊ नये, यासाठी अनेक अडथळे आणले गेले. शेवटी त्यांना कोर्टात धाव घ्यावी लागली. या सर्वांमुळे अंधेरीत ऋतुजा लटके यांच्या बाजूने वातावरण निर्मिती झाली होती. भाजपाला माहिती होते की, इथे आपला पराभव होणार आहे. पराभवाची खात्री झाल्यानंतर भाजपाने निवडणुकीतून माघार घेण्याचा निर्णय घेतला, अशी टीका जयंत पाटील यांनी केली.