अंधेरीत रंगणार मतयुद्ध! हायकोर्टात ठाकरे गटाला दिलासा; ऋतुजा लटके आज भरणार उमेदवारी अर्ज
By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2022 06:25 AM2022-10-14T06:25:06+5:302022-10-14T06:25:45+5:30
भाजप-शिंदे गटाचे मुरजी पटेलही रिंगणात उतरणार, आणखी तिघांचे अर्ज दाखल
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीतील ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांना गुरुवारी उच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाला. लटके यांनी महापालिकेच्या नोकरीचा दिलेला राजीनामा शुक्रवारी सकाळी ११पर्यंत स्वीकारून तसे पत्र त्यांना देण्याचे आदेश न्यायालयाने मुंबई महापालिकेला दिले. त्यामुळे लटके आज, शुक्रवारी उमेदवारी अर्ज भरतील. दरम्यान, भाजप-शिंदे गटाचे मुरजी पटेलही रिंगणात उतरणार असून, त्यावर आज शिक्कामोर्तब होईल. याशिवाय आणखी तिघांचे अर्ज दाखल झाले आहेत. त्यामुळे अंधेरी येथे मतयुद्ध रंगण्याची शक्यता आहे.
काय म्हणाले न्यायालय?
एका लिपिकाला राजीनामा द्यायचा आहे, त्यांना निवडणूक लढायची आहे. उमेदवारी अर्ज भरण्याची १४ ऑक्टोबर शेवटची तारीख आहे. विशेषाधिकार केव्हा वापरणार? अशी विचारणा न्या. नितीन जामदार व न्या. शर्मिला देशमुख यांच्या खंडपीठाने महापालिकेकडे केली.
तुमच्याकडे विशेषाधिकार असताना आमच्यापर्यंत हे प्रकरण पोहोचायलाच नको होते. हे केवळ राजीनामा पत्र आहे. एका लिपिकाने राजीनामा दिला आहे, त्यास ‘हो’ किंवा ‘नाही’ असे उत्तर द्या. आमच्यावर भार टाकू नका, अशा शब्दांत न्यायालयाने फटकारले.
का झाला होता पेच?
शिवसेनेचे आमदार रमेश लटके यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेवर अंधेरीत पोटनिवडणूक होत आहे. ठाकरे गटाने दिवगंत रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा यांना उमेदवारी दिली आहे. मात्र, लटके यांनी पालिकेच्या नोकरीचा दिलेला राजीनामा स्वीकारण्यात न आल्याने तांत्रिकदृष्ट्या अडचण निर्माण झाली होती. त्याविरोधात लटके यांनी उच्च न्यायालयात दाद मागितली होती. त्यावर लटके यांच्या बाजूने निकाल लागला. त्यानंतर लटके म्हणाल्या की, आज मला न्यायदेवतेने न्याय दिला आहे. मी पतीचा वारसा पुढे घेऊन जाणार आहे.