मुंबई: मुंबईतील अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीवरून शिवसेना आणि भाजप-शिंदे गट आणने-सामने आले होते. पण, आधी मनसे अध्यक्ष राज ठाकरे(Raj Thackeray) आणि त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या आवाहनानंतर भाजपने पोटनिवडणुकीतून माघार घेतली. यावर आता भाजप नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस(Devendra Fadanvis) यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
संबधित बातमी-'भाजपने निवडणुकीतून माघार घेतली, आता शंका घेणे योग्य नाही', शरद पवार स्पष्टचं बोलले
माध्यमांशी संवाद साधताना देवेंद्र फडमवीस म्हणाले की, 'दिवंगत नेत्यांच्या जागी त्यांच्या कुटुंबातील कुणी उभे राहत असेल, तर अशा जागांवर उमेदवार न देण्याची परंपरा आहे. आर आर पाटील, पतंगराव कदम गेले त्यावेळी भाजपने उमेदवार दिलेला नव्हता. आताही शरद पवार आणि राज ठाकरे यांच्या विनंतीवरुन पोटनिवडणुकीतून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे. अंधेरी पोटनिवडणुकीतून माघार घेतली नसती तर आमच्या उमेदवाराचा नक्की विजय झाला असता. पण राज्याची राजकीय संस्कृती अशी नाही,' अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
संबधित बातमी-'राज ठाकरे मुर्दाबाद...', भाजपच्या माघारीनंतर मुरजी पटेलांचे कार्यकर्ते आक्रमक
फडणवीस पुढे म्हणाले की, 'निवडणूक लढवली पाहिजे, असे आमच्या सर्व कार्यकर्त्यांचे मत होते. निवडून येण्याची आम्हाला पूर्ण गॅरंटी होती. पण, राज ठाकरे, शरद पवार यांनी बिनविरोध निवडणुकीसाठी विनंती केली. काही जणांनी पडद्याआडून आम्हाला विनंती केली, त्यावर आम्ही विचार केला. त्यानंतर मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी बोललो, आमच्या वरिष्ठांशी बोललो. कधीकधी कार्यकर्त्यांची नाराजी पत्करुन असे निर्णय घ्यावे लागतात,' असेही ते म्हणाले.