अंधेरी पूर्व येथील शिवसेनेचे आमदार रमेश लटके यांच्या निधनाने रिक्त झालेल्या जागेवर आज पोटनिवडणूक आहे. याचे मतदान सकाळी ७ वाजल्यापासून सुरु झाले आहे. ही निवडणूक जरी चुरशीची नसली तरी बिनविरोध झालेली नाही. ठाकरे गटाच्या उमेदवारासमोर दुसरा तुल्यबळ उमेदवार नसल्याने मतदारांमध्येही फारसा उत्साह नसल्याचे चित्र आहे.
अंधेरी पूर्व येथील शिवसेनेचे आमदार रमेश लटके यांच्या निधनाने रिक्त झालेल्या या जागेवर पोटनिवडणूक होत आहे. या पोटनिवडणुकीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून ऋतुजा लटके यांनी तर अपक्ष म्हणून मिलिंद कांबळे, नीना खेडेकर, फरहाना सय्यद, राजेश त्रिपाठी यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. याशिवाय बाला नाडर यांनी आपकी अपनी पार्टी पीपल्स या पक्षाकडून अर्ज भरला आहे. गुरुवारी सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत होणार आहे. मतदान करता यावे यासाठी सार्वजनिक सुट्टी लागू करण्यात आली आहे.
महाराष्ट्र विधानसभेच्या '१६६ - अंधेरी पूर्व' या मुंबई उपनगर जिल्ह्याच्या विधानसभा मतदारसंघातील सर्व २५६ मतदान केंद्रांवर मतदानाला सकाळी ७ वाजतापासून प्रत्यक्ष मतदानास सुरुवात झाली आहे. यात दुपारी ३ वाजेपर्यंत २२.८५ टक्के मतदान झाले असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी प्रशांत पाटील यांनी दिली आहे. अंधेरी पूर्व मतदार संघात दुपारी १ वाजेपर्यंत १६.८९ टक्के मतदान झाले होते.
मुरजी पटेल यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. एका महिलेवर अन्याय होऊ नये, असे माझे मत आहे. पुढे जाऊन ऋतुजा लटकेंची तृप्ती सावंत करू नये. मी आता मतदान करत आहे. अंधेरीतील नागरिकांनी देखील मतदान करण्यासाठी बाहेर पडावे, असे आवाहन पटेल यांनी केले.भाजपा आणि शिंदे गटाकडून नोटाला मतदान करण्याचा प्रचार करण्यात आल्याचा आरोप लटकेंनी केला होता. यावर आम्ही नोटाला मतदान करण्याचा प्रचार केला नाही. कोणाला मत द्यायचे हा ज्याचा त्याचा अधिकार आहे, असे पटेल म्हणाले.