Andheri East By Election: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वादात केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेनेचे (Shivsena) धनुष्यबाण चिन्ह गोठवले. चिन्ह गोठवल्यानंतर राजकीय घडामोडी वाढल्या आहेत. निवडणूक आयोगाच्या निर्णयामुळे अंधेरी पोटनिवडणुकीत शिवसेनेला धनुष्यबाण चिन्ह वापरता येणार नाही. यातच आता पोटनिवडणुकीबाबत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी पक्षाची भूमिका स्पष्ट केली आहे.
नाना पटोले यांनी माध्यमांशी संवाद साधताना सांगितले की, 'अंधेरी पोटनिवडणुकीमध्ये काँग्रेस पक्ष उद्धव ठाकरे यांच्या सोबत असणार आहे. सोनिया गांधी यांच्याशी आम्ही चर्चा केली, त्यानंतर आम्ही हा निर्णय घेतला. ही जागा काँग्रेसची आहे, पण सहकार्य करू असा निर्णय आम्ही घेतलाय. मित्र अडचणीत आला तर त्याला मदत करणे हाच आमचा धर्म आहे. काँग्रेस पूर्ण ताकदीने शिवसेना उमेदवाराचा प्रचार करेल,' असे नाना पटोले म्हणाले.
ते पुढे म्हणतात की, 'निवडणूक आयोगावर दबाव आणून शिवसेनेचे चिन्ह गोठवण्यात आले. एक अत्याचारी केंद्र सरकारच्या रुपात आलाय, त्याला हरवण्यासाठी आम्हा महाविकास आघाडीच्या रुपात एकत्र आहोत. लोकशाहीत सत्य कधीही पराजित होऊ शकत नाही. भाजपने असत्याच्या मार्गाने सत्ता घेतली. भाजप इतर पक्षांना संपवण्याचे आणि देशाचा नाश करण्याचे काम करत आहे. पण, हे जास्त काळ चालू शकणार नाही,' असेही पटोले म्हणाले.