अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली असून पहिल्या फेरीत पोस्टल मतांची मोजणी करण्यात आली. यामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांना मोठी आघाडी मिळाली आहे. परंतू नोटाला पडलेल्या मतांनी देखील लक्ष वेधले आहे.
पहिल्या फेरीत ऋतुजा लटके यांना ४२७७ मते मिळाली आहेत. तर नोटाला त्यापाठोपाठ ६२२ मते मिळाली आहेत. तर बाला नाडार - 222, मनोज नाईक - 56, मीना खेडेकवर- 138, फरहान सय्यद- 103, मिलिंद कांबळे- 79, राजेश त्रिपाठी- 127 एवढी मते मिळाली आहेत. दुसऱ्या फेरीत लटके यांना एकूण ७८१७ मते मिळाली. या फेरीतही लटके यांना आघाडी मिळाली आहे. अंधेरीत सात उमेदवार रिंगणार आहेत. दुसऱ्या फेरीपर्यंत नोटाला १४७० मते मिळाली आहेत.
देशभरातील सहा राज्यांतील सात विधानसभा सीटवर पोटनिवडणूक झाली आहे. आज यावर मतमोजणी असणार असून तीन भगवा दल, दोन काँग्रेस आणि एक शिवसेना आणि राजद अशा पक्षांकडे असलेले मतदारसंघ आहेत.
अंधेरी पूर्व या मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी ३१.७४ टक्के मतदान झाले आहे. अंधेरी पूर्व येथील शिवसेनेचे आमदार रमेश लटके यांच्या निधनाने रिक्त झालेल्या या जागेवर पोटनिवडणूक होत आहे. या पोटनिवडणुकीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून ऋतुजा लटके यांनी तर अपक्ष म्हणून मिलिंद कांबळे, नीना खेडेकर, फरहाना सय्यद, राजेश त्रिपाठी यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. याशिवाय बाला नाडर यांनी आपकी अपनी पार्टी पीपल्स या पक्षाकडून अर्ज भरला आहे. या निवडणुकीत मतदानाची टक्केवारी घसरल्याने तसेच भाजपा-शिंदे गटाने नोटाचा कथित प्रचार केल्याने ठाकरे गटाच्या गोटात अस्वस्थता आहे.