मुंबई - दक्षिण कोकणातील जागृत देवस्थान अशी ख्याती असलेल्या मालवण तालुक्यातील आंगणेवाडी येथील श्री देवी भराडीच्या जत्रौत्सवाची तारीख जाहीर झाली आहे. आंगणेवाडीच्या श्री भराडीदेवीचा जत्रौत्सव ४ फेब्रुवारी २०२३ रोजी होणार असल्याचे देवस्थानकडून जाहीर करण्यात आले आहे.
आंगणेवाडी येथील श्री भराडी देवी हे लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आहे. त्यामुळे या जत्रौत्सवाला लाखो भक्तांचा जनसागर लोटत असतो. तसेच केवळ सिंधुदुर्गच नाही तर मुंबई, ठाण्यासह महाराष्ट्रातील इतर भागांसह शेजारील राज्यांमधूनही लाखो भाविक हे भराडीदेवीच्या दर्शनासाठी येत असतात. त्यामुळे या जत्रौत्सवाच्या नियोजनासाठी भराडीदेवी देवस्थान आणि आंगणे कुटुंबीय मेहनत घेत असतात.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्वात मोठा लौकिक असलेल्या या जत्रौत्सवाला लाखो भाविकांसह सिंधुदुर्गासह राज्यातील विविध राजकीय पक्षांचे नेते दर्शनासाठी येत असतात. तसेच भाविकांच्या सोईसाठी एसटी आणि रेल्वेकडून विशेष गाड्यांचेही नियोजन होत असते.