लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : अंगणवाडी सेविकांना दरमहा किमान साडेसात हजार रुपये मानधन देण्याच्या प्रस्तावाला लवकरच मंजुरी मिळणार आहे. येत्या ६ जूनला मानधनवाढ समितीच्या बैठकीत यासंदर्भात घोषणा करण्याचे आश्वासन महिला व बालविकास विभागाच्या सचिवांनी दिल्याचा दावा, महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीने केला आहे. बुधवारी आझाद मैदानात निदर्शनां वेळी समितीने ही माहिती दिली.समितीच्या निमंत्रक शुभा शमीम म्हणाल्या की, ‘मानधनवाढीच्या मागणीवर गेल्या कित्येक दिवसांपासून समितीची बैठक प्रलंबित होती. अखेर ६ जूनला बैठक पार पडणार आहे.’ त्यासंदर्भात कृती समितीच्या शिष्टमंडळाने सचिवांसोबत आज चर्चा केली. या चर्चेत सचिवांनी सांगितले की, ‘अंगणवाडी कर्मचाऱ्यांपैकी सेविकांना किमान ७ हजार ५०० रुपये मानधनवाढ देण्यात येईल. तर सेविकांना मिळणाऱ्या वाढीच्या ७५ टक्के वाढ मदतनिसांना देण्याचा प्रस्ताव आहे. सध्या सेविकांना दरमहा ५ हजार, तर मदतनिसांना अडीच हजार रुपये मानधन मिळत आहे. सोबतच अंगणवाडीमधील आहार शिजवण्याचे काम बाहेरच्या व्यक्तीला दिले जाईल. त्यामुळे किचन पद्धत बंद होऊन अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे काम हलके होणार आहे.’
अंगणवाडी सेविकांना किमान ७ हजार ५०० रुपये मानधन!
By admin | Published: June 01, 2017 3:55 AM