मुंबई : परभणीच्या जिंतूर तालुक्यातील बोर्डी येथील अंगणवाडी सेविका सुमित्रा संवडकर यांनी गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सोमवारी ही दुख:द घटना घडली असून सुमित्रा यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीमुळे कर्मचाऱ्यांमधून सरकारविरोधात तीव्र रोष व्यक्त होत आहे.
अंगणवाडी चालवुन सुद्धा पगार होत नसल्यामुळे आत्महत्या करत असल्याचे त्यांनी लिहिलेल्या पत्रात समोर आले आहे. कित्येकदा आंदोलन करून सुद्धा अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नाकडे सरकार कानाडोळा करत आहे. एकीकडे शासकीय कर्मचाऱ्यांना सहावा व सातवा वेतन आयोग लागू होत असताना अंगणवाडी कर्मचाऱ्यांकडे मात्र सरकार दुर्लक्ष करत असल्याचा आरोप अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे नेते दिलीप उटाणे यांनी केला आहे.
उटाणे यांनी सांगितले की, राज्यातील जवळपास ६५ हजार सेविका व मदतनिस यांचे जूनपासून मानधन झाले नाही. त्यात पीएफएमएस प्रणालीचा त्रासामुळेच आत्महत्या करत असल्याचे आत्महत्याग्रस्त सेविकेने चिठ्ठीत लिहिले आहे. त्यामुळे आता आंगणवाडी कर्मचारी पीएफएमएस प्रणाली रद्द करण्यासाठी आंदोलन करतील. संपकाळात शासनाने दिलेले आश्वासन पुर्ण केले नाही, म्हणूनच एका सेविकेला जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे मानधन देण्यात दिरंगाई करणाऱ्या अधिकाऱ्यांविरोधात मनुष्यवधाचा गुन्हा नोंद करण्याची मागणी अंगणवाडी कर्मचारी कृती समिताने केली आहे.
ऑनलाईन आणि डिजिटल इंडियाचा बळी...अंगणवाडी सेविका सुमित्रा सवंडकर हिची आत्महत्या नसून शासनाने केलेली डिजिटल हत्या आहे. शासनाला जाब विचारलाच पाहिजे. 10 वर्षांची सर्व रजिस्टर्स एकत्रित देण्याची जबरदस्ती करणार्यांवर 306 चा गुन्हा नोंदविण्यात यावा.- शुभा शमीम, अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या नेत्या.
सुमित्रा सवंडकर यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेली चिठ्ठी...