किडनी रॅकेटचा संशय : सात फूट खड्ड्यातून मृतदेह पोलिसांनी उकरुन काढला वाई : मुंबई येथील हिरानंदानी हॉस्पिटलमध्ये किडनी रॅकेट उघडकीस येऊन पाच डॉक्टरांना अटक झाल्याची घटना ताजी असतानाच दोन महिन्यांपासून गायब असलेल्या वाई येथील अंगणवाडी सेविका मंगला जेधे (वय ४५, रा. वेलंग ता .वाई) यांचाही खून किडनीसाठीच झाला असल्याचा संशय व्यक्त होत आहे. आज सायंकाळी मंगला यांचा मृतदेह पोलिसांनी धोम परिसरातून जमिनीतून उकरुन काढला असून वाई येथीलच डॉक्टर संतोष पोळ याला अटक केली आहे. गेल्या दोन महिन्यांपासून अंगणवाडी सेविका संघटनेच्या राज्याध्यक्षा मंगलाबाई जेधे बेपत्ता होत्या. त्यांचे अपहरण झाल्याचा संशय व्यक्त होत होता. दोन दिवसांपूर्वी अंगणवाडी सेविकांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून जेधे यांच्या अपहरणाचा तपास ‘सीआयडी’कडे द्यावा, अशी मागणी केली होती. पोलिसांनी डॉक्टर संतोष पोळ याला मुंबई येथून अटक केल्यानंतर जेधे यांचा खून झाल्याचे स्पष्ट झाले. त्याने ज्या ठिकाणी जेधे यांचा मृतदेह पुरला होता. ती जागाही त्याने दाखविली. सात फूट खड्ड्यात एका पोत्यामध्ये जेधे यांचा मृतदेह त्याने गुंडाळून ठेवला होता.