मालवण : लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या व दक्षिण कोकणचे प्रति पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आंगणेवाडी येथील श्री भराडी देवीच्या जत्रोत्सवाचा प्रारंभ शनिवारी पहाटे ४ वाजता उत्साहात झाला.
गर्दी मर्यादित असल्याने दोन रांगांद्वारे देवीचे दर्शन देण्यात आले. तर तुलाभार करण्यासाठी वेगळ्या रांगेची व्यवस्था करण्यात आली आहे.यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या जत्रोत्सवासाठी प्रशासनाने कडक निर्देश घातल्याने केवळ आंगणे कुटुंबीय व नातेवाईक यांनी देवीचे दर्शन घेतले.दरवर्षी मोड जत्रे दिवशी म्हणजे यात्रेच्या दुसऱ्या दिवशी देवीचे दर्शन घेऊन ओटी भरणाऱ्या आंगणे ग्रामस्थांनी प्रथमच सहकुटुंब मुख्य उत्सवाच्या दिवशी देवीचे दर्शन घेतले. पोलिसांकडून आंगणेवाडीत प्रवेश करणाऱ्या मुख्य तीन मार्गांवर बॅरिकेट्स उभारून केवळ आंगणे कुटुंबीय पास ओळखपत्र असलेल्यानाच आंगणेवाडीत प्रवेश देण्यात येत होता. आरोग्य विभागाकडून यात्रेकरू भाविकांची आरोग्य तपासणी करूनच देवालयात प्रवेश देण्यात येत आहे.शासनाचे निर्देश पाळणे आवश्यक असल्याने यावर्षी देवीच्या भक्तांनी घरीच थांबून आई भराडी मातेचे मनोभावे स्मरण करावे. देवी भराडी तुमच्या मनोकामना निश्चित पूर्ण करेल. त्यामुळे भक्तांनी आज शनिवारी व रविवारी असे दोन दिवस आंगणे कुटुंबियांना सहकार्य करण्याचे आवाहन आंगणे कुटुंबियांच्या वतीने मंडळाचे अध्यक्ष भास्कर आंगणे यांनी केले आहे.