संदीप कणसे, ऑनलाइन लोकमत
अंगापूर, दि. ९ - सातारा जिल्ह्यातील अंगापूर तर्फ व अंगापूर वंदन ही शेजारी-शेजारी असणारी दोन गावे. जुळ्या भावंडांप्रमाणे जणू! दोन्ही गावांच्यामध्ये फक्त एक ओढा! दोन्ही गावांत गणपतीची प्राचीन मंदिरे. दोन्ही गावांची मिळून ८ हजार लोकसंख्या आहे, पण इथल्या एकाही घरात गणपती बसविला जात नाही, अथवा सार्वजनिक गणेशोत्सव साजरा केला जात नाही. मात्र दोन्ही गावांतील गणपती मंदिरांमध्ये भद्रोत्सव साजरा केला जातो. हा उत्सव नुकताच मोठ्या हर्षोल्हासात व भक्तीमय वातावरणात साजरा झाला. हजारो भाविक भक्तांच्या उपस्थितीत भक्तिमय व पारंपरिक पद्धतीने मोठ्या उत्साहात भद्रोत्सव साजरा झाला. ‘मोरया म्हणा दोरया, दोरया म्हणा मोरया’ च्या जयघोषाने अंगापूरचा परिसर दुमदुमून गेला होता. संपूर्ण महाराष्ट्रात गणेशोत्सव साजरा होत आहे. मात्र, अंगापूरचा गणेशोत्सव म्हणजे आगळावेगळा भद्रोत्सव साजरा होतो. भाद्रपद प्रतिपदेपासून सुरू होणारा हा उत्सव अनेक दिवस चालतो. या निमित्ताने अंगापूर वंदन व अंगापूर तर्फ या दोन्ही गावांमध्ये असणा-या प्राचीन गणपती मंदिरामध्ये धूप आरती, भजने, कीर्तने या धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले होते. गणेश चतुर्थी व पंचमी हे दोन दिवस मुख्य उत्सवाचे असल्याने या काळात भाविकांच्या दर्शन घेण्यासाठी रांगा लागल्या होत्या. एका दिवसात अंगापूर, फडतरवाडी, लिंबाचीवाडी येथील युवकांनी अंदाजे ६० ते ६५ किलोमीटर अंतर अनवाणी पायांनी चालत (दोरा) प्रदक्षिणा पूर्ण करत परिसरातील दैवतांना जलाभिषेक केला.या प्रदक्षिणेत जवळपास ६५० ते ७०० युवक सहभागी झाले होते. यावेळी फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली होती. गणपतीचे उपासक यांनी प्रज्वलित भगतपात्र डोक्यावर घेऊन अंगापूर वदन व अंगापूर तर्फ या दोन गावांतून मोठ्या भक्तीपूर्ण वातावरणात ‘मोरया म्हणा दोरया’ च्या जयघोषात प्रदक्षिणा पूर्ण केल्या. यावेळी भाविकांनी प्रदक्षिणा मार्गावर एकच गर्दी केली होती. शेकडो वर्षांची परंपरा..
या उत्सवाला शेकडो वर्षांची परंपरा आहे. तर नवसाला पावणारा गणपती म्हणून यांची सर्वदूर ओळख आहे. यामुळे महाराष्ट्रासह सातारा जिल्ह्याच्या काना कोपºयातून भाविक, भक्त मोठ्या संख्येने दाखल होत असतात. तसेच गावांतील नोकरी, व्यवसायासाठी बाहेर असणारे ग्रामस्थ, माहेरवाशीण मोठ्या भक्तिभावाने सहभागी झाले होते.