- दीपक कुलकर्णी -
एरवी सर्वसामान्य माणसासारखी भासणारी ही माणसं.. त्यांचं असामान्यत्व जेव्हा सिद्ध करतात तेव्हा तो प्रसंग असतो काही क्षणांचा , तासांचा आणि कधी कधी काही दिवसांचाही आणि तो ही थरार आणि छातीत धडकी भरवणारा..अगदी जीवन- मरणाच्या कसोटीवर शरीर, संवेदना, मन, संयम, धैर्य यांची कठोर परीक्षा पाहणारा... दिवसभरात जेव्हा कधी ''तो '' कॉल येतो आणि त्यांचा फोन खणाणतो तेव्हापासून सुरु होतो '' हा '' क्षण.. रात्री येणाऱ्या फोनची संख्या त्यातल्या त्यात जास्त.. कधी ऊन असते तर कधी धो धो कोसळणारा पाऊस.. काहीवेळा अगदी कडाक्याची थंडीसुद्धा..कधी घरात एखादा आनंदाचा प्रसंग असतो तर कधी कुटुंबाला हवी असते सोबत.. पण जेव्हा जेव्हा म्हणून यांना '' कॉल '' येतो..तेव्हा तेव्हा ही मंडळी बाकी सर्व एका क्षणार्धात तिथल्या तिथे सोडून धावतात फक्त माणुसकीची जाण ठेवून.... अपघातातील हजारो मृतदेहांना मृत्यूच्या खाईतून बाहेर काढत कुटुंबियांकडे सोपविणारी, असंख्य जीवांना वाचविणारी ही पोरं म्हणजे ''देवदूता'' समानच... !
आज लोणावळा येथील लायन्स पॉईंटला गुजरातच्या एका तरुणीने आत्महत्या केली. तिचा मृतदेह बाहेर काढतानाचा शिवदुर्ग ट्रेकर्सचा व्हिडीओ सोशल मीडियावर नजरेस पडला..आणि सेकंदात दोन वर्षांपूर्वी जुलै२०१८ मध्ये कोकण विद्यापीठाचे ३३ लोक सहलीसाठी जात असताना त्यांची गाडी आंबेनळी घाटात खोल दरीत पडली होती..त्या अपघातात ३२ जणांचा अंत झाला होता..त्यावेळी दिवसरात्र आणि मुसळधार पावसात ८०० फूट खोल दरीत उतरून अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत ३२ जणांचे मृतदेह आणि आज गुजरातच्या तरुणीचा मृतदेह बाहेर काढल्यानंतर समोर आली ती ट्रेकर्स मंडळी आणि त्यांची धीरोदात्त व अद्वितीय कामगिरी..यात सह्याद्री, शिवदुर्ग, महाबळेश्वर यांसारख्या ट्रेकर्स संस्थांचा सहभाग होता..या प्रमुख संस्थांनी प्रतिनिधी स्वरूपात जर पहिले तर आजपर्यंत अगणित मृतदेहांना बाहेर काढले तर असंख्य जीवांना जीवदान देखील दिले.. परंतू, महाराष्ट्रात ठिकठिकाणी अशा संस्था उत्तमप्रकारे कार्यरत असतीलही पण त्यांचे कार्य आजतागायत समोर आले नाही.. आपण नातेवाईकाच्या कठीण प्रसंगात मदतीला धावताना सुद्धा नोकरी, इतर कामे सांगून मोकळे होतो..परंतु ह्या मंडळींना नसेल का नोकरी, कुटुंब, व्यवसाय असे काही.. पण काही सेकंदात जागच्याजागी थांबवून कुठलाही मागचा पुढचा विचार न करता संकटकाळात धावून जाणारे ही माणसं.. माणसं कसली खऱ्याखुऱ्या अर्थाने जीवावर उदार होऊन माणुसकी जागवणारी ही मंडळी म्हणजे देवदूतच...खरं सांगायचं झालं तर ही सर्व मंडळी फार वडिलोपार्जित इस्टेटने समृद्ध असतात असे अजिबात नाही..रोज दोन घास सुखाने खाऊन सुखी मानणारी.. तसेच एकदिवस कष्ट केले नाही तरी उद्या चणचण निर्माण व्हावी अशी प्रत्येकाची जेमतेम परिस्थिती. गाड्यांची धडक, दरीत गाडी, माणूस पडणे , महापूर, इमारत कोसळणे, आग यांसारखी कोणतीही घटना तशी धक्कादायकच...यांसारखी घटना ऐकताना किंवा टीव्हीवर पाहताना देखील आपलं अवसान गळतं. पण ही मंडळी मदतीच्या भावनेतून आपल्या सहकाऱ्यांशी शक्य तितक्या लवकर संपर्क घटनास्थळी पोहचते. आणि त्याठिकाणी पोहचल्यानंतर प्रशासन, पोलीस, डॉक्टर, नागरिक यांच्याशी बोलून विनाविलंब काम सुरु करतात...समोरच्या कठीण प्रसंगात स्वतः ला स्थिर ठेवण्यासोबतच जास्तीत जास्त जीवांचा प्राण वाचविण्याकडे कल ठेवावा लागतो.. समोरच्या कठीण प्रसंगात स्वतः ला स्थिर ठेवण्यासोबतच जास्तीत जास्त जीवांचा प्राण वाचविण्याकडे कल ठेवावा लागतो ..कधी कधी या मित्रांच्या काही तासांच्या अथक प्रयत्नानंतर शेवटच्या क्षणी नियती अपयश पदरी टाकते तेव्हा फार वाईट वाटते..पण अशी एखादी आव्हानात्मक मोहीम फत्ते होते तेव्हा या सेवेतून मिळणारं समाधान खूप वेगळं.. या भीषण प्रसंगात कितीतरी काळ पोटात काही पडेल याची शाश्वती नाही. आणि मिळाले तरी विदारक आणि भयावह चित्र उभे असताना फक्त आत ढकललेले ते अन्न कितपत पचवता येईल हाही प्रश्नच..
आंबेनळी अपघातानंतर सचिन जवळकोटे यांनी लोकमत 'मंथन ' साठी लिहिलेल्या ' मृत्यूच्या खाईतले देवदूत' या शीर्षकाखाली सहयाद्री ट्रेकर्स, महाबळेश्वर ट्रेकर्स, आणि शिवदुर्ग ट्रेकर्स यांसारख्या काही ग्रुपच्या जबरदस्त काम करणाऱ्या झुंजार मावळ्यांची खूप प्रेरणादायी आणि मानवतेची व्याख्या ठळक करणारी अशी कहाणी लिहिली आहे. या आर्टिकलचा आधार घेऊन सांगावेसे वाटते.. छंदासाठी ट्रेकिंग करणारे तरुण पोरं वेगळी आणि आणि अशी खोल दरीत उतरून मृतदेह बाहेर काढणारी आणि काहीशे जीवांचे प्राण वाचविणारे तरुण पोरं वेगळी. छंदापायी ट्रेकिंग करणारे वर चढतात आणि माणुसकीवर प्रेम करणारी उंचावरून खाली नुसते डोकावले तरी भुरळ येईल अशा खोल दरीत उतरतात. एवढी सगळी कष्ट उपसल्यावर समाज त्यांच्या कितपत पाठिशी उभा राहतो याचे उदाहरण म्हणजे ज्यांच्या नातेवाईकांसाठी ही मंडळी अतोनात परिश्रम घेतात ती लोकं यांना थँक्यू सुद्धा न म्हणता निघून जातात.. तेव्हा मात्र या मंडळींना खूप वाईट वाटते.. पण तेही अगदी काही क्षणांपूरते..पुढच्या क्षणी हे सर्व जण मागचं सारं काही विसरून नव्या मोहिमेसाठी सज्ज असतात..
दुर्दम्य इच्छाशक्तीच या जिगरबाज देवदूतांची प्रेरणा आहे.कुठून येतं हे सारं.. ?