अतुल कुलकर्णी । लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : सरकारमध्ये राहून सरकारचीच अंत्ययात्रा काढायची आणि स्वत:च्या मुखपत्रातून फोटो छापून आणून शेतकऱ्यांचा खोटा कैवार घ्यायचा, शिवसेनेच्या या दुटप्पी भूमिकेवर भाजपामध्ये प्रचंड संताप असून हिंमत असेल, तर सरकारमधून बाहेर पडा, असा सूर उमटू लागला आहे.शेतकरी आंदोलनात आता शिवसेना सक्रिय झाली असून आंदोलन पेटविण्याचा प्रयत्न होत आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नाशिकमध्ये शेतकऱ्यांची सभादेखील घेतली. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीला शिवसेनेचा पाठिंबा असेल तर त्यांनी मंत्रिमंडळ बैठकीत तसा प्रस्ताव आणावा. मंत्रिमंडळात शिवसेनेचे ऐकले जात नसेल तर ते डिसेंट नोटही देऊ शकतात. पण कोणतीही वैधानिक प्रक्रिया न करता सत्तेत राहून सरकारची बदनामी करायची, हे तर ज्या प्लेटमध्ये जेवण करतो तीच प्लेट फोडण्याचा प्रकार असल्याची संतप्त प्रतिक्रिया भाजपाच्या एका वरिष्ठ नेत्याने दिली आहे. जर मनासारखे होत नसेल तर त्यांनी सत्तेत कशाला राहायचे, असा सवालही या नेत्याने केला.भाजपाला शेतकऱ्यांचा हा प्रश्न नीट सोडवता येत नसेल तर शिवसेनेने काँग्रेस, राष्ट्रवादीला सोबत घेऊन सरकार स्थापन करावे. त्यांचे कोणी हातपाय धरलेले नाहीत, असेही तो नेता म्हणाला. स्वत:च्या सरकारची पक्षाच्या मुखपत्रातून अशा प्रकारे टोकाची बदनामी करत असताना आपल्याही मंत्र्यांची बदनामी होत आहे याचे साधे भानही शिवसेना नेतृत्वाला उरलेले नाही, अशी टीकाही त्या नेत्याने केली.>राष्ट्रवादीचे झेंडे घेऊन आंदोलनात जाऊ नका!शेतकऱ्यांच्या आंदोलनात सहभागी व्हा, वातावरण तापत ठेवा पण पक्षाचे झेंडे, बॅनर घेऊन आंदोलनात जाऊ नका, अशा सूचना राष्ट्रवादीच्या सर्वाेच्च नेत्यांनी दिल्याची माहिती समोर आली आहे. राष्ट्रवादीचे पहिल्या फळीचे नेते विविध आरोपांमुळे अडचणीत सापडले आहेत. पक्षाच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह लागलेले असताना आपण जर आंदोलनात गेलो तर शेतकरी पेटून उठला आणि शेतकऱ्यानेच सरकारच्या विरोधात बंड केले असे चित्र उभे राहणार नाही, म्हणून या सूचना दिल्या गेल्याचे समजते. काँग्रेसची अवस्था तर बिकटच आहे. आम्ही संघर्ष यात्रा काढली म्हणूनच सरकारने कर्जमाफी जाहीर केली, असे विधान माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले आहे. प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी आंदोलनाला पाठिंबा जाहीर केला असला तरी पक्षाने त्यात सक्रियपणे सहभागी व्हावे की नाही याविषयी कोणतीही भूमिका स्पष्ट केलेली नाही. त्यामुळे या दोन्ही पक्षांतील स्थानिक नेत्यांना या आंदोलनात करायचे तरी काय, असा प्रश्न पडला आहे. सहभागी नाही झालो तर मतदार शेतकरी नाराज होईल आणि पक्षाची झूल उतरवून गेलो तर कोणी विचारत नाही, अशी अवस्था या आंदोलनाबाबत दोन्ही काँग्रेसची झाली आहे.
शिवसेनेच्या दुटप्पी भूमिकेवर भाजपात संताप
By admin | Published: June 07, 2017 5:43 AM