- बाळा पडेलकरयंदा दहीहंडी उत्सवात नियमांचे उल्लंघन होणार नाही, यासाठी गोविंदा पथके प्रयत्न करतील, पण उत्सवातून आयोजकांनी काढता पाय घेतला आणि गोविंदा पथकांमधील नाराजी पाहता, उत्सवातील त्यांच्या सहभागावरच प्रश्न निर्माण झाले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेले आश्वासन पूर्ण होईल, अशी आशा बाळगत आॅक्टोबरमध्ये होणाऱ्या सुनावणीकडे लक्ष आहे. या सुनावणीत तरी महाधिवक्त्यांनी समन्वय समितीचे पदाधिकारी आणि हजारो गोविंदांच्या मनाचा विचार करून बाजू मांडावी, अशी अपेक्षा आहे.दहीहंडी हा केवळ उत्सव नसून, आपली संस्कृती आहे. गेली अनेक वर्षे केवळ महाराष्ट्रातच नव्हे, तर आंतरराष्ट्रीय कॅनव्हासवर या दहीहंडीने मानाचे स्थान मिळविले आहे. गोपाळकाला हा सण महाराष्ट्रात समूहाने एकत्रित येऊन साजरा करण्याचा उत्सव आहे. श्रीकृष्णाने गायी चारताना आपल्या सवंगड्यांसह सर्वांच्या शिदोऱ्या एकत्र करून त्या खाद्यपदार्थांचा काला केला व तेथूनच दहीहंडी फोडण्याची प्रथा सुरू झाली. शक्य तितक्या उंचीवर मानवी मनोऱ्यांचे एकावर एक थर रचून त्यावर उभ्या राहिलेल्या ‘एक्क्या’ने आपल्या मुठीने ती हंडी फोडण्याची ही परंपरा आहे, पण गेल्या दहा वर्षांत या उत्सवाला मिळालेल्या विविध वलयांमुळे हा सण सातासमुद्रापलीकडे पोहोचण्यास मदत झाली.तरुणाईला दहीहंडीचे वेध लागताच शरीरयष्टी बनविण्यासाठी अनेक जण व्यायामशाळांमध्ये आवर्जून हजेरी लावतात. थरांचा टिकाव लागण्यासाठी नियमित व्यायाम आणि आहारचेही योग्य पालन ही तरुणपिढी आवर्जून करते. यातील बहुतांश मुले-मुली कबड्डी, खो-खो अशा खेळांशी संबंधित असतात. गेल्या १० हून अधिक वर्षे ३५ ते ४० वयोगटातील गोविंदा आपला कामधंदा सांभाळून सरावाला हजेरी लावतात. दहीहंडीला अवघे काही दिवस उरले असताना, सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयामुळे सर्वच गोविंदा पथकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. दहीहंडीचे थर केवळ २० फूट आणि १८ वर्षांखालील गोविंदाना सहभागी होता येणार नाही, असा निर्णय न्यायालयाने दिला आहे. फक्त चार थर लावण्याचा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय म्हणजे, या उत्सवातील थरार काढून घेण्यासारखा आहे. त्यामुळे दहीहंडी बंद पाडण्यासाठी हे सगळे सुरू आहे का? अशी शंका मनात आल्यावाचून राहत नाही. स्पेनमध्ये कॅसलर्सने उंचच उंच मनोरे रचण्याची शिस्तबद्ध परंपरा अवितरणपणे सुरू ठेवली आहे. यातील कौशल्य लक्षात घेऊन आंतरराष्ट्रीय कॅनव्हासवरील दहीहंडीचा मान टिकवून ठेवण्यासाठी तरी, न्यायालयाच्या निर्णयातून पुन्हा एकदा विचार करून सुवर्णमध्य काढणे अपेक्षित होते. गेली अनेक वर्षे दहीहंडीदरम्यान होणाऱ्या अपघातांमध्ये सातत्याने वाढ होते आहे, असे चित्र उभे केले जाते. मात्र, त्यामागील सत्याची पडताळणी केली जात नाही. वास्तविक, शिस्तबद्ध पद्धतीने कसून सराव केल्यास अपघातांचे प्रमाण कमी होऊ शकते. दहीहंडीच्या थरांवरून कोसळणाऱ्या गोविंदांपेक्षा त्या दिवशी दुचाकीवरून फिरताना होणाऱ्या अपघातांची संख्या जास्त असते, पण अशा अपघातग्रस्तांची संख्याही गोविंदांच्या अपघातात गृहीत धरली जाते. पर्यायाने गोविंदांच्या अपघातांत वाढ, असे चित्र सर्वसामान्य घरांपर्यंत पोहोचत असते. राजकारणाचा या उत्सवावर प्रचंड पगडा आहे, हे मान्य. मात्र, या निमित्ताने होणाऱ्या गुंतवणुकीमुळे हा उत्सव विस्तारण्यास मदत झाली, हेही तितकेच खरे, परंतु गेल्या काही वर्षांत उत्सवातील सेलिब्रिटींची रेलचेल, धांगडधिंगा आणि नाचगाण्यांमुळे उत्सवात आलेला अडथळा कदापि मान्य नव्हता. सुरुवातीला गोविंदा पथकांचा उत्साह वाढविण्यासाठी येणारे सेलिब्रिटीच या उत्सवाचे केंद्र बनले. याचा फटका उत्सवादरम्यान थर रचताना गोविंदा पथकांना सहन करावा लागत असतो.१९९८ साली श्री दत्त क्रीडा मंडळाने कोहिनूर येथील आयोजनात पहिल्यांदा आठ थरांचा विक्रम रचला, तर पहिल्यादांच नऊ थरांचा विश्वविक्रमाचा प्रयत्नही दत्त क्रीडा मंडळानेच केला आहे. मात्र, त्या वेळी त्यांच्या पदरी अपयश आले. मात्र, २००८ साली नऊ थरांचा जागतिक विश्वविक्रमही माझगाव दक्षिण विभाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ या पथकाच्या नावावर आहे. २०१३ साली पार्ले स्पोर्ट्स क्लबच्या सात थर रचले होते. शिवाय, सातासमुद्रापारही या महिला पथकाने थर रचून परदेशी नागरिकांचे मन जिंकले. सातत्याने केलेल्या सरावानंतर हे मनोरे रचण्याचे यश गोविंदा पथकांना मिळाले आणि निश्चितच या टप्प्यानंतर खऱ्या अर्थाने उत्सवाच्या ‘थरथराट’ अधिकच वाढला, पण गोविंदा पथकांनी मात्र ही स्पर्धा अतिशय सकारात्मक पद्धतीने स्वीकारून कसून सराव सुरू ठेवला आहे.कित्येक वर्षांच्या संघर्षानंतर अखेरीस दहीहंडीला साहसी खेळाचा दर्जा मिळवून देण्यासाठी २०१५ साल उजाडावे लागले खरे, पण आता सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर आता या उत्सवातील साहसच निघून गेले आहे. राज्य शासनाने क्रीडा धोरणात साहसी खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी अॅडव्हेंचर स्पोर्ट्स सेंटर स्थापण्याचे २०११ साली प्रस्तावित केले होते. साहसी खेळांना प्रशिक्षण मिळावे आणि खेळांचा विकास व्हावा, हा यामागील उद्देश होता. त्यामुळे या अॅडव्हेंचर स्पोर्ट्स सेंटरच्या स्थापनेबाबत हालचाल करायला हवी होती. साहसी खेळाचे प्रशिक्षण, सुविधा, संस्थांना परवानग्या, मान्यता, उपक्रमाचे नियोजन, अभ्यासक्रम या सर्व गोष्टींचा समावेश या प्रस्तावित सेंटरमध्ये करण्यात आला आहे, पण आजतागायत या सेंटरसाठी राज्य शासनाला मुहूर्त मिळालेला नाही. यावरूनच शासनाची उदासीनता स्पष्टपणे लक्षात येते.
(लेखक दहीहंडी समन्वय समितीचे अध्यक्ष आहेत.)