मुंबई : राज्यात व केंद्रातील सत्तेत सहभागी असतानाही, भाजपाने स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीत आम्हाला अपेक्षित जागा दिलेल्या नसल्याने कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आहे. मात्र, तरीही महायुतीचा धर्म म्हणून त्यांच्यासमवेत निवडणुकांना सामोरे जात आहोत, असे केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी सोमवारी पत्रकारांशी बोलताना सांगितले. आठवले म्हणाले, ‘महायुतीमध्ये सेना नसल्याने आम्हाला भाजपाकडून अधिक जागा मिळण्याची अपेक्षा होती. त्यासाठी रिपाइंच्या कार्यकर्त्यांनी तयारीही सुरू केली होती. भाजपाला आम्ही पहिल्यांदा ४५ जागांचा, त्यानंतर ३५ जागांचा प्रस्ताव दिला होता. मात्र, २५ जागा देण्याचे मान्य करून प्रत्यक्षात १९ जागा दिल्या आहेत. त्यामुळे माझ्यासह कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता आहे. मात्र, ज्या जागा मिळाल्या आहेत. त्या निवडून येऊ शकणाऱ्या असल्याने, आम्ही तडजोड स्वीकारली आहे. मात्र, आमचे उमेदवार हे कमळाच्या चिन्हावर नाही, तर स्वतंत्र चिन्हावर निवडणूक लढवतील, आमचे उमेदवार असलेल्या ठिकाणांहून भाजपाच्या उमेदवारांनी माघार घेण्याचे ठरले आहे. १९ उमेदवारांमध्ये १२ महिलांना संधी देण्यात आली,’ असेही त्यांनी पुढे स्पष्ट केले. (प्रतिनिधी)
भाजपाकडून नाराज; पण महायुती कायम - आठवले
By admin | Published: February 07, 2017 5:16 AM