जळगाव : गेल्या चार वर्षांत विरोधात षडयंत्र रचून मला छळण्यात आले. माझा पक्षावर रोष नाही, मात्र माझ्याविरुद्ध कट रचणाऱ्या पक्षातीलच नेत्यांवर कारवाई करण्याची आपली मागणी असून ती चार ते पाच नावे आपण नेतृत्वाकडे दिली आहे. त्यांच्यावर कारवाई झाली तर आपले काही म्हणणे नाही, अन्यथा पक्षांतर करण्याचा इशारा माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी दिला.
खडसे यांनी गुरुवारी नागपूर येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. या भेटीनंतर ते शुक्रवारी जळगावात परतले. पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, पक्षावर माझी नाराजी नाही, मात्र कट रचणाऱ्यांवर कारवाईची मागणी कायम आहे. माझ्यावर आरोप करणे, चौकशा लावणे, असे प्रकार त्यांनी केले आहेत. या लोकांविरुद्ध मी तक्रार केली आहे. त्यांची नावेही तक्रारीत दिली असून त्यासंबंधी सर्व पुरावेही दिले आहेत. त्यामुळे पक्षाने आता त्यांच्यावर कारवाई करावी, हीच अपेक्षा आहे. ज्यांच्यावर माझा रोष आहे, त्यांच्यासोबत मी काम कसे करणार? पक्षाने संबंधित लोकांवर कारवाई केली नाही तर पक्षांतर करेल. माझ्या समर्थकांसह राज्यभरातील कार्यकर्त्यांचा माझ्यावर पक्षांतराचा मोठा दबाव आहे, असेही खडसे यावेळी म्हणाले.
ज्यांच्यावर गंभीर स्वरुपाचे आरोप आहेत, अशा अन्य नेत्यांना पक्षात प्रवेश मिळतो. त्यांना पक्षात महत्त्वाचे स्थान दिले जाते. इतर पक्षातील नेत्यांना पायघड्या टाकल्या जात असताना मला डावलण्याचे कारण काय? असा प्रश्नही खडसे यांनी उपस्थित केला. दरम्यान, आपण कोणत्या पक्षात जाणार हे त्यांनी स्पष्ट केलेले नाही. त्यामुळे खडसे यांच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.मंत्रीपदाचा राजीनामा देण्यापासून ते विधानसभा निवडणुकीत उमेदवारी नाकारल्याने व त्यानंतरही मुलगी अॅड. रोहिणी खडसे यांचा पक्षातीलच हितशत्रूंमुळे पराभव, पक्षांच्या कार्यक्रमात डावलणे अशा विविध कारणामुळे भाजपकडून सतत अन्याय व अपमानाची वागणूक मिळत असल्याचे सांगत खडसे यांनी या पूर्वी अनेक वेळा जाहीर नाराजी व्यक्त केली. त्यानंतर गोपीनाथ गडावर पक्षांतराबाबत ‘माझा काही भरोसा नाही’, असे म्हणणारे एकनाथराव खडसे हे शिवसेनेत जाणार तर कधी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाणार असे वृत्त सध्या येत आहे.
उत्तर महाराष्ट्रात भाजप वाढीमध्ये सिंहाचा वाटा असणाºया खडसे यांच्यावर पक्षाकडून खरोखरच अन्याय होत असल्याचे आता त्यांचे समर्थक, कार्यकर्ते म्हणू लागले आहेत. मात्र खडसे जो काही निर्णय घेतील, तो विचारपूर्वकच घेतील, असेही कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. त्यात नागपुरात अधिवेशन काळातच खडसे तेथे असल्याने ते काय निर्णय घेतात, याकडे लक्ष लागले आहे.