ठाणे/नवी मुंबई : दिघ्यातील बेकायदा निवासी इमारतींवर सोमवारी कारवाई करण्यात आली. येथील रहिवाशांनी याला विरोध करीत रेल्वेमार्ग रोखला. या कारवाईमुळे निवडणूक आचारसंहिता लागू असतानाच नोकरशाही केवळ लोकांना बेघर करीत असल्याची चौफेर टीका होऊ लागली आहे. ‘कमर्शिअल’ बांधकामांबाबत मात्र प्रशासन मवाळ भूमिका घेत असल्याबद्दल निषेध केला जात आहे.दिघ्यातील बेकायदा इमारतींवर कारवाई करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. मात्र अचानक कारवाई केली गेली तर ठाणे, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ-बदलापूर अशा शहरांतील शेकडो बेकायदा इमारतींमधील रहिवाश्यांनी जायचे कुठे, असा सवाल लोक करीत आहेत.मुंबईतील कॅम्पाकोला या बहुचर्चित बेकायदा इमारतीमध्ये लब्धप्रतिष्ठीत वास्तव्य करीत असल्याने त्या इमारतींवरील कारवाईचे आदेश न्यायालयाने दिल्यावर मीडिया, लोकप्रतिनिधींनी धाव घेत रहिवाशांना पाठिंबा दिला. पण ठाणे जिल्ह्यातील शेकडो बेकायदा इमारतींमध्ये वास्तव्य करणाऱ्या लक्षावधी लोकांकरिता सध्या लोकप्रतिनिधींना वेळ नाही. यासाठी महापालिका निवडणुकीच्या प्रचाराचे कारण दिले जात आहे. शिवाय आचारसंहिता लागू असतानाच कारवाई करण्याचा मुहूर्त नोकरशहांनी काढल्याने लोकप्रतिनिधींच्या हस्तक्षेपावर मर्यादा आल्या आहेत.(प्रतिनिधी)
दिघा येथील कारवाईबाबत प्रचंड नाराजी
By admin | Published: February 14, 2017 3:50 AM